CNG Prices Hiked : इराण-अमेरिका युद्धाची झळ मुंबईकरांना; सीएनजी आणि पीएनजीच्या दरात पुन्हा मोठी वाढ!

spot_img

मे महिन्यातील दुसरी दरवाढ; ऑटो-टॅक्सी भाडे वाढण्याची दाट शक्यता, ३१ लाख ग्राहकांना फटका.

इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचे गंभीर परिणाम आता भारतीय बाजारपेठेवर आणि थेट सर्वसामान्यांच्या खिशावर दिसू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, जागतिक ऊर्जा पुरवठा साखळीतील अडथळे आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची होणारी घसरण यामुळे देशात इंधनाचा तुटवडा आणि महागाई सातत्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर, मुंबई महानगर प्रदेशात (MMR) आजपासून सीएनजी (CNG) आणि पीएनजी (PNG) च्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ लागू करण्यात आली आहे, ज्यामुळे मुंबईकरांना महागाईचा मोठा दणका बसला आहे.

महानगर गॅस लिमिटेडने (MGL) दिलेल्या माहितीनुसार, मुंबई आणि आसपासच्या परिसरात सीएनजीचा दर प्रति किलो २ रुपयांनी वाढवून तो आता ₹८४ वरून ₹८६ करण्यात आला आहे. तर, घरगुती पाईप गॅस म्हणजेच पीएनजीचा दर ५० पैशांनी वाढवून ₹५१.५० वरून ₹५२ प्रति युनिट करण्यात आला आहे. विशेष म्हणजे चालू मे महिन्यातील सीएनजी दरवाढीची ही दुसरी फेरी आहे. यापूर्वी १३ मे रोजी सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ झाली होती, तर एप्रिल महिन्यातही १ रुपयाची वाढ करण्यात आली होती.

सततच्या या दरवाढीमुळे मुंबईतील ऑटो, टॅक्सी आणि बस चालकांवर मोठा आर्थिक भार पडत असून आता प्रवास महागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे ‘मुंबई रिक्षामेन्स युनियन’ आणि इतर टॅक्सी संघटनांनी इंधन खर्च परवडत नसल्याचे सांगत किमान २ ते ३ रुपये भाडेवाढ करण्याची मागणी केली आहे.
भाडेवाढीचा हा अधिकृत प्रस्ताव परिवहन विभागामार्फत मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाकडे (MMRTA) पाठवला जाणार आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास थेट दैनंदिन प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना अधिकचे पैसे मोजावे लागतील.

गॅस दरात कराव्या लागलेल्या या वाढीबाबत स्पष्टीकरण देताना महानगर गॅस लिमिटेडने सांगितले की, जागतिक पातळीवरील घडामोडींमुळे गॅस खरेदीच्या खर्चात प्रचंड वाढ झाली आहे. या दरवाढीचा थेट परिणाम मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह संपूर्ण एमएमआर परिसरातील सार्वजनिक वाहतुकीवर होणार असून, पीएनजीचे दर वाढल्यामुळे क्षेत्रातील ३१ लाखांहून अधिक घरगुती ग्राहकांचे बजेट कोलमडणार आहे. जर हे युद्ध पुढील काही दिवस असेच सुरू राहिले, तर देशातील महागाईची परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते, अशी भीती आर्थिक तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ