राज्यात गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालं असतानाच औरंगाबादमध्ये एक धक्कादायक हत्या प्रकरण समोर आलं आहे. किरकोळ कारणावरून एका तरुणाचा जीव घेतल्याची घटना उघडकीस आली असून खून केल्यानंतर आरोपींनी सोशल मीडियावर रील पोस्ट केल्यामुळेच ते पोलिसांच्या तावडीत सापडले आहेत.
ओमकार चंद्रकांत सूर्यवंशी असे मृत तरुणाचे नाव असून तो नांदेड जिल्ह्यातील रामनगर परिसरात राहत होता. मासे विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या ओमकारचा मृतदेह 18 मे रोजी लवकी गावाजवळील शेतात कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या घटनेनंतर एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि संशयित दुचाकीचा माग काढला. त्याचवेळी सोशल मीडियावर अभिनेता संजय दत्तच्या ‘महानता’ चित्रपटातील ‘टपका रे टपका’ या गाण्यावर तयार करण्यात आलेलं एक रील सायबर पोलिसांच्या निदर्शनास आलं. या व्हिडीओमधील चेहरे आणि तपासातील माहिती जुळल्यानंतर आरोपींची ओळख पटली.
रवी दुधमल, सय्यद हाशिम आणि एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. चौकशीत “दारू आणण्यासाठी उशीर का झाला?” या कारणावरून त्यांनी ओमकारची हत्या केल्याची कबुली दिली. गुन्ह्यानंतर आरोपी परराज्यात पळून गेले होते. मात्र, पोलिसांनी भाजी विक्रेत्याचा वेश धारण करून नांदेडमधील गुन्हेगारी वस्तीत सलग तीन दिवस पाळत ठेवली. आरोपी घरी परतताच पोलिसांनी त्यांना अटक केली.
या घटनेमुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून गुन्हेगार स्वतःच पुरावे कसे तयार करत आहेत, याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.




