सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे अनेक जण रिल्सच्या माध्यमातून लोकप्रिय होत आहेत. काहींनी याच माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे, तर काहींच्या वागणुकीमुळे वाद निर्माण होताना दिसत आहेत. अशाच एका घटनेमुळे सध्या सोशल मीडियावर रील स्टार महेश मोटे चर्चेत आला आहे.
पुणे-पंढरपूर महामार्गावरील जेजुरी टोल नाक्यावर महेश मोटे याने केलेल्या गोंधळाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. टोल न भरल्यामुळे कर्मचाऱ्यांनी त्याची गाडी अडवल्यानंतर महेश मोटे संतापल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. “मी रील स्टार आहे, माझी गाडी का अडवली?” असा सवाल करत त्याने टोल कर्मचाऱ्यांशी अरेरावी केल्याचा आरोप होत आहे.
व्हिडीओमध्ये महेश मोटे टोल कर्मचाऱ्यांना दमदाटी करताना दिसत असून, “मी अनेकांना मदत केली आहे, तरी माझी गाडी अडवली,” असं म्हणत त्याने कर्मचाऱ्यांची नावं विचारून वाद वाढवल्याचं पाहायला मिळत आहे. या संपूर्ण प्रकारामुळे टोल नाक्यावर काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं आणि वाहनांच्या रांगाही लागल्या.
विशेष म्हणजे, हा संपूर्ण प्रकार घडल्यानंतर महेश मोटे याने स्वतःच त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. व्हिडीओमध्ये टोल कर्मचाऱ्यांनी वाद टाळण्यासाठी अखेर त्याची गाडी टोल न घेता सोडल्याचा दावा करण्यात आला आहे.
दरम्यान, हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर नेटीझन्सनी महेश मोटेच्या वर्तनावर जोरदार टीका केली आहे. प्रसिद्धी आणि सोशल मीडिया फॉलोअर्सच्या जोरावर नियमांपेक्षा स्वतःला मोठं समजण्याच्या मानसिकतेवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.




