राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा जवळपास सुटल्याचं स्पष्ट होत आहे. आज झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत महाविकास आघाडीने 17 पैकी तब्बल 15 जागांवर सहमती दर्शवल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर या प्राथमिक फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.
मात्र, नांदेड आणि नाशिक या दोन महत्त्वाच्या जागांवर अद्यापही अंतिम निर्णय झालेला नाही. या दोन्ही मतदारसंघांवर तिन्ही पक्षांनी दावा कायम ठेवल्यामुळे जागावाटपाचा पेच आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जागांबाबतचा निर्णय पुढील चर्चेनंतर जाहीर केला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला सर्वाधिक 8 जागा आल्या आहेत. चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा-गोंदिया, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव-बीड-लातूर आणि नागपूर पोटनिवडणूक या जागांवर काँग्रेस निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गटाला 4 जागा मिळाल्या असून रत्नागिरी, जळगाव आणि परभणी-हिंगोली या भागांत पक्ष आपले उमेदवार उतरवणार असल्याचं समजत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे, ठाणे आणि सातारा-सांगली या तीन जागा देण्यात आल्याची माहिती आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया देताना, “ही निवडणूक आम्ही एकजुटीने लढणार आहोत. उर्वरित दोन जागांबाबत चर्चा सकारात्मक दिशेने सुरू आहे आणि लवकरच तोडगा निघेल,” असं सांगितलं.
विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात थेट राजकीय सामना रंगण्याची चिन्हं दिसत असून आता नांदेड आणि नाशिकच्या जागांवर अंतिम निर्णय काय होतो, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.




