Neet Paper Leak Accused : NEET पेपरफुटी प्रकरणात नवा खुलासा; आरोपीच्या मुलाची CBI समोर धक्कादायक कबुली

spot_img

देशभरात गाजलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणात आता आणखी एक मोठा खुलासा समोर आला आहे. या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी मानल्या जाणाऱ्या शिवराज मोटेगावकर यांच्या अल्पवयीन मुलाने CBI चौकशीत महत्त्वाची माहिती दिल्याचे समोर आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, परीक्षेच्या जवळपास दहा दिवस आधीच त्याला फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या विषयांचे प्रश्नपत्र संच उपलब्ध करून देण्यात आले होते. या कबुलीमुळे तपास यंत्रणांना या संपूर्ण रॅकेटबाबत नवे धागेदोरे मिळाले आहेत.

तपासादरम्यान संबंधित विद्यार्थ्याने केवळ स्वतःलाच नव्हे, तर आणखी दोन विद्यार्थ्यांनाही हे प्रश्नपत्र संच देण्यात आल्याचे सांगितले असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या प्रकरणाचा व्याप आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तपास यंत्रणा आता प्रश्नपत्रिका कोणाकडून आणि कोणत्या साखळीद्वारे पुरवण्यात आल्या, याचा शोध घेत आहेत.

शिवराज मोटेगावकर यांचा RCC कोचिंग संस्थेशी संबंध असल्याचे सांगितले जाते. आपल्या मुलाला नामांकित वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी गैरमार्गाचा अवलंब केल्याचा आरोप तपास यंत्रणांकडून करण्यात आला आहे. NEET पेपरफुटीचे धागेदोरे महाराष्ट्रासह हरियाणा आणि राजस्थानपर्यंत पोहोचल्याने या प्रकरणाने राष्ट्रीय स्तरावर खळबळ उडवली आहे. आतापर्यंत अनेक संशयितांना अटक करण्यात आली असून तपासाचा विस्तार सुरू आहे.

CBI कडून पुण्यात मोटेगावकर यांच्या मुलाची सखोल चौकशी करण्यात आली. या चौकशीतून आणखी मोठी नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच प्रश्नपत्रिका विकत घेणारे पालक आणि विद्यार्थी यांच्यावरही आता तपास यंत्रणांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढील काही दिवसांत आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ