पुण्यातील गाजलेल्या पोर्शे अपघात प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल अग्रवाल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जामिनावर सुटका झाल्यानंतर अग्रवाल कुटुंबाने आयोजित केलेल्या पार्टीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये विशाल अग्रवाल आणि त्यांची पत्नी आनंदात नाचताना दिसत असून त्यांच्या गळ्यात नोटांचे हार घातलेले दिसतात. “मुंबई से आया मेरा दोस्त” या गाण्यावर कुटुंबीयांसोबत सुरू असलेला जल्लोष पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. एका नातेवाईकाने विशाल अग्रवाल यांना उचलून घेतल्याचे दृश्यही व्हिडीओमध्ये दिसत आहे.
पुण्यात झालेल्या भीषण पोर्शे अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात अल्पवयीन मुलगा भरधाव वेगाने गाडी चालवत असल्याचा आरोप होता. अपघातानंतर त्याला अटक करण्यात आली होती. मात्र, मुलाच्या रक्त तपासणीत मद्यप्राशनाचा पुरावा मिळू नये म्हणून रक्तनमुने बदलल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला होता. यासाठी ससून रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांची मदत घेतल्याचा आरोप विशाल अग्रवाल यांच्यावर ठेवण्यात आला होता.
या प्रकरणानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली होती. आरोपी कुटुंबाने पुरावे दडपण्याचा, ड्रायव्हरवर दबाव आणण्याचा आणि विविध मार्गांनी प्रकरण वळवण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा होती. काही काळ फरार राहिल्यानंतर पोलिसांनी विशाल अग्रवाल यांना अटक केली होती. आता जामिनावर सुटका झाल्यानंतर समोर आलेल्या या पार्टी व्हिडीओमुळे पुन्हा एकदा या प्रकरणाची चर्चा रंगली असून सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.




