इराण-अमेरिका तणावाच्या काळात भारत संरक्षण क्षेत्रात आक्रमक; दक्षिण चीन समुद्रात चीनची कोंडी करण्यासाठी व्हिएतनाम सज्ज
इराण आणि अमेरिकेमधील वाढत्या युद्धजन्य तणावाच्या पार्श्वभूमीवर, जागतिक राजकारणात भारताने आपले संरक्षण धोरण अधिक आक्रमक केले आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले असतानाच, दुसरीकडे भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे पाच दिवसांच्या महत्त्वपूर्ण दौऱ्यावर व्हिएतनाम आणि दक्षिण कोरियाला रवाना झाले आहेत. राजनाथ सिंह यांनी स्वतः इन्स्टाग्राम पोस्टद्वारे या दौऱ्याची माहिती दिली असून, यादरम्यान दोन्ही देशांशी द्विपक्षीय आणि लष्करी संबंध मजबूत करण्यासाठी मोठे संरक्षण करार होण्याची दाट शक्यता आहे. या दौऱ्यातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची घडामोड म्हणजे, भारताचे सर्वात शक्तिशाली सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ‘ब्रह्मोस’ (BrahMos) खरेदी करण्याची तीव्र इच्छा व्हिएतनामने व्यक्त केली असून, राजनाथ सिंह यांच्या हनोई दौऱ्यात या महाकरारावर अंतिम चर्चा होणार आहे.
याच महिन्याच्या सुरुवातीला व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांनी भारताचा दौरा केला होता. या दौऱ्यादरम्यान भारताने व्हिएतनामसाठी तब्बल $500 दशलक्ष (५० कोटी डॉलर्स) क्रेडिट लाईनची (पतपुरवठा) घोषणा केली होती. यासोबतच, भारताने व्हिएतनामला समुद्री सुरक्षेसाठी तीन ते चार सागरी गस्ती नौका आणि डझनहून अधिक वेगवान गस्ती नौका देण्याची ऑफरही दिली आहे. याच पार्श्वभूमीवर आता दोन्ही देशांमधील लष्करी करारांना वेग आला असून, दक्षिण चीन समुद्रात चीनच्या वाढत्या दादागिरीला चोख उत्तर देण्यासाठी व्हिएतनाम भारताकडून ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र खरेदी करण्याच्या तयारीत आहे. याआधी २०२२ मध्ये भारताने फिलीपिन्ससोबत $३७५ दशलक्षचा ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा यशस्वी करार केला होता, ज्याचा वापर फिलीपिन्स दक्षिण चीन समुद्रातील वादात स्वतःच्या संरक्षणासाठी करत आहे.
फिलीपिन्सप्रमाणेच व्हिएतनामचाही दक्षिण चीन समुद्रावरून बीजिंग (चीन) सोबत जुना आणि तीव्र सीमावाद आहे. चीनच्या विस्तारवादी धोरणाला लगाम घालण्यासाठी व्हिएतनामला आपली सागरी सुरक्षा अधिक मजबूत करायची आहे आणि त्यासाठी भारताचे ‘ब्रह्मोस’ हे जगातील सर्वात वेगवान क्षेपणास्त्र त्यांच्यासाठी अत्यंत प्रभावी ठरणार आहे. चीनच्या अगदी शेजारी असलेल्या व्हिएतनामला हे महाविनाशक क्षेपणास्त्र देऊन भारत चीनला आंतरराष्ट्रीय स्तरावर अत्यंत मोठा आणि धोरणात्मक दणका देण्याच्या तयारीत आहे. व्हिएतनामने स्वतःहून या खरेदीत मोठी स्वारस्य दाखवले असल्याने, राजनाथ सिंह यांच्या या दौऱ्यात या ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून यामुळे आशियातील लष्करी समीकरणे पूर्णपणे बदलणार आहेत.




