ऊसाचा रस शरीराला त्वरित ऊर्जा देत असला तरी, त्याच्या अतिवापरामुळे रक्तातील साखर आणि यकृताच्या समस्या उद्भवू शकतात; पाहा काय म्हणतात तज्ज्ञ.
उन्हाळ्याच्या तडाख्यापासून सुटका मिळवण्यासाठी रस्त्याच्या कडेला मिळणारा थंडगार ऊसाचा रस हा अनेकांचा आवडीचा पर्याय असतो. घसा कोरडा पडल्यावर एक ग्लास रसाने त्वरित तरतरी येत असली, तरी हाच रस तुमच्या आरोग्यासाठी ‘सायलेंट किलर’ ठरू शकतो, असा धोक्याचा इशारा आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे. गॅस्टोएंटेरोलॉजिस्ट डॉ. मुकेश नंदाल यांच्या मते, ऊसाच्या रसात नैसर्गिक साखरेचे प्रमाण अत्यंत जास्त असते आणि त्या तुलनेत फायबरचे प्रमाण नगण्य असते. यामुळे रसाचे सेवन केल्यावर साखर थेट रक्तात मिसळते, ज्यामुळे ‘ब्लड शुगर’ची पातळी झपाट्याने वाढू शकते. विशेषतः मधुमेहाचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी हा थंडगार रस अत्यंत जीवघेणा ठरू शकतो.
केवळ मधुमेहच नाही, तर ऊसाच्या रसाच्या अतिसेवनाचा थेट परिणाम तुमच्या यकृतावर (Liver) होतो. अति साखरयुक्त पेयामुळे ‘फॅटी लिव्हर’चा त्रास वाढण्याची आणि पर्यायाने वजन वेगाने वाढण्याची शक्यता असते. मुंबईत बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर आता लोक खाद्यपदार्थांबाबत अधिक सतर्क झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर, भर उन्हात दररोज ऊसाचा रस पिणे टाळावे, असा सल्ला दिला जात आहे. जर तुम्हाला फॅटी लिव्हर किंवा साखरेची समस्या असेल, तर ऊसाचा रस पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे अनिवार्य आहे.
आरोग्य जपताना केवळ रसाचे गुणधर्मच नाही, तर तो ज्या ठिकाणी बनवला जातो तिथली स्वच्छता पाहणेही तितकेच महत्त्वाचे आहे. अस्वच्छ ठिकाणी बनवलेला रस पोटाचे विकार वाढवू शकतो. त्यामुळे उन्हापासून बचाव करण्यासाठी रस पिताना तो मर्यादित प्रमाणात असावा आणि शक्य असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच त्याचे सेवन करावे, जेणेकरून उन्हाळ्याचा आनंद घेताना तुमच्या आरोग्याला कोणताही मोठा फटका बसणार नाही.




