आजच्या धावपळीच्या जीवनात फिट आणि निरोगी राहण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या व्यायामप्रकारांचा अवलंब करत आहेत. त्यामध्ये सायकलिंग हा सर्वात सोपा, कमी खर्चिक आणि प्रभावी व्यायाम मानला जातो. लहान मुलं चालायला लागल्यानंतर त्यांना दिली जाणारी पहिली मोठी भेट अनेकदा सायकलच असते. कारण सायकल चालवताना संपूर्ण शरीर सक्रिय राहते आणि नकळत व्यायामही होतो.
सायकलिंगमुळे शरीरातील पाय, मांडी, कंबर आणि पोटाचे स्नायू मजबूत होतात. नियमित सायकल चालवल्याने शरीर अधिक तंदुरुस्त आणि सक्रिय राहते. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठीही हा उत्तम पर्याय मानला जातो. याशिवाय शरीराचा समतोल सुधारतो आणि स्नायूंमध्ये ताकद वाढते.
आरोग्यतज्ज्ञांच्या मते, दररोज सायकलिंग केल्यास फुफ्फुसांची क्षमता वाढते आणि शरीराला अधिक प्रमाणात ऑक्सिजन मिळतो. त्यामुळे स्टॅमिना वाढून थकवा कमी जाणवतो. शरीराची सहनशक्ती आणि कार्यक्षमताही सुधारते. हृदय निरोगी ठेवण्यासाठीही सायकलिंग फायदेशीर असल्याचे सांगितले जाते.
सायकलिंगचा सकारात्मक परिणाम मानसिक आरोग्यावरही दिसून येतो. नियमित सायकल चालवल्याने तणाव कमी होतो, मन प्रसन्न राहते आणि झोपेची गुणवत्ता सुधारते. तसेच व्यक्तीमध्ये आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.
तज्ज्ञांच्या मते, सायकलिंग सुरू करताना सुरुवातीला 15 ते 20 मिनिटांपासून सुरुवात करावी आणि नंतर हळूहळू वेळ वाढवावा. सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर करणे आणि शरीरातील पाण्याची कमतरता टाळण्यासाठी पुरेसे पाणी पिणेही आवश्यक आहे.
पर्यावरणपूरक आणि आनंददायी व्यायाम म्हणून सायकलिंगकडे पाहिले जात असून आज सर्व वयोगटातील लोकांमध्ये त्याची लोकप्रियता वाढताना दिसत आहे.




