दोन वर्षांत पक्षाची झेप आणि थेट सत्ता काबीज; राहुल गांधींच्या उपस्थितीत पार पडला दिमाखदार शपथविधी सोहळा
तामिळनाडूच्या राजकारणात आज एका नवीन युगाचा उदय झाला आहे. चित्रपटसृष्टी गाजवल्यानंतर राजकारणात प्रवेश करणाऱ्या अभिनेता विजय थलापती याने आज तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. अवघ्या दोन वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या आपल्या पक्षाच्या जोरावर विजयने प्रस्थापितांना मोठा धक्का दिला आणि तामिळनाडूची सत्ता काबीज केली. चेन्नई येथे पार पडलेल्या एका भव्य सोहळ्यात तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांनी विजय यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. विजय यांच्यासोबतच इतर ९ मंत्र्यांचाही शपथविधी आज सकाळी १० वाजता पार पडला. जेव्हा विजय शपथ घेण्यासाठी उभे राहिले, तेव्हा त्यांच्या चाहत्यांनी आणि समर्थकांनी संपूर्ण परिसर घोषणाबाजीने दणाणून सोडला होता.
या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही विशेष उपस्थिती दर्शवली होती. तामिळनाडूच्या या निवडणुकीत विजयच्या पक्षाला मिळालेले यश हे देशातील सर्वात चर्चेचे सत्तापरिवर्तन ठरले आहे. विशेष म्हणजे, या सरकारमध्ये काँग्रेसचाही सहभाग असणार आहे. तब्बल ५९ वर्षांनंतर काँग्रेस तामिळनाडूच्या सत्तेत भागीदार होत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. “आमचा आनंद शब्दात व्यक्त करता येणार नाही, आम्ही या सरकारचा २०० टक्के भाग असू,” अशा भावना एका काँग्रेस नेत्याने व्यक्त केल्या आहेत.
राज्यपाल अर्लेकर यांनी मुख्यमंत्री विजय यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी १३ मे पर्यंतची मुदत दिली आहे. शपथविधीनंतर विजय यांनी हात जोडून जनतेचे आभार मानले. तामिळनाडूच्या जनतेने एका अभिनेत्यावर जो विश्वास टाकला आहे, तो सार्थ ठरवण्याचे मोठे आव्हान आता विजय यांच्यासमोर असेल. संपूर्ण देशाचे लक्ष आता तामिळनाडूतील या ‘विजय’ पर्वाकडे लागले असून, राज्याच्या विकासासाठी हे नवीन सरकार कोणती पावले उचलणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.




