SSC Result 2026 Marathi : दहावीच्या परीक्षेत मराठी विषयात ९० हजाराहून अधिक विद्यार्थी नापास

spot_img

महाराष्ट्रात मराठी भाषेच्या वापराबाबत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान दहावीच्या निकालातून एक चिंताजनक वास्तव समोर आले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या 2026 च्या दहावीच्या निकालात एकूण उत्तीर्णतेचे प्रमाण 92.09 टक्के इतके समाधानकारक असले, तरी मराठी विषयातील विद्यार्थ्यांची कामगिरी मात्र चिंता वाढवणारी ठरली आहे.

प्रथम भाषा म्हणून मराठीची निवड केलेल्या 10 लाख 87 हजार 699 विद्यार्थ्यांपैकी तब्बल ९४,५४४ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. तसेच द्वितीय आणि तृतीय भाषा म्हणून मराठी शिकणाऱ्या 4 लाख 13 हजार 917 विद्यार्थ्यांपैकी 13 हजार 741 विद्यार्थी नापास झाले आहेत.

शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, विद्यार्थ्यांमध्ये मराठी वाचनाची घटती सवय, शुद्धलेखनातील सातत्याने होणाऱ्या चुका आणि भाषेतील कमी होत चाललेली रुची ही यामागची प्रमुख कारणे आहेत. त्यामुळे शिक्षण पद्धतीत बदल करून विद्यार्थ्यांमध्ये मराठीबद्दल आकर्षण निर्माण करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. काही तज्ज्ञांनी मराठी विषय दहावीऐवजी बारावीपर्यंत अनिवार्य करण्याची मागणीही केली आहे.

दरम्यान, यंदाच्या निकालात कोकण विभागाने सर्वाधिक 97.62 टक्के निकालाची नोंद केली. राज्यातील नऊ विभागीय मंडळांतून 15 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 14 लाख 20 हजार 486 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

विशेष म्हणजे, द्वितीय आणि तृतीय भाषा म्हणून गुजराती निवडणाऱ्या सर्व 302 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्या भाषेचा निकाल 100 टक्के लागला आहे. अरेबिक भाषेचाही निकाल 99 टक्क्यांहून अधिक लागल्याने मराठीच्या निकालाबाबत अधिक चर्चा सुरू झाली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ