महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज अधिकृतरीत्या जाहीर होणार आहे. दुपारी १ वाजता राज्य मंडळाकडून निकाल प्रसिद्ध केला जाणार असून, यंदा परीक्षा दिलेल्या लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.
यावर्षी राज्यातील विविध विभागांतून तब्बल १६ लाख १५ हजार ४८९ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे. काही दिवसांपासून निकालाच्या तारखेची चर्चा सुरू होती आणि अखेर आज विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ पाहायला मिळणार आहे. यंदाच्या निकालाची एकूण टक्केवारी किती राहणार, तसेच मागील वर्षांप्रमाणे मुली पुन्हा एकदा मुलांपेक्षा सरस ठरणार का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
निकाल जाहीर होताच विद्यार्थी अधिकृत संकेतस्थळांवर जाऊन आपला सीट नंबर आणि आईचे नाव टाकून गुणपत्रिका पाहू शकणार आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी चांगल्या गुणांची अपेक्षा व्यक्त केली असून, काही ठिकाणी निकालासाठी शाळांमध्येही विशेष तयारी करण्यात आली आहे.
दरम्यान, एखाद्या विषयात अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्यास विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकन, उत्तरपत्रिकेची पडताळणी आणि छायाप्रती मिळवण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे निकालाबाबत शंका असल्यास विद्यार्थ्यांना अधिकृत प्रक्रियेच्या माध्यमातून दाद मागण्याची संधी मिळणार आहे.
निकालाचा दिवस विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. त्यामुळे आजचा दिवस अनेकांसाठी आनंद, उत्साह आणि पुढील वाटचालीची दिशा ठरवणारा ठरणार आहे.




