महाराष्ट्रात सध्या एक विचित्र प्रकार सुरू आहे. राज्यात रोज कुठेतरी अन्याय होतोय, अत्याचार होतोय, भ्रष्टाचाराचे इमले कोसळतायत, पण जेव्हा जनतेने किंवा विरोधकांनी प्रश्न विचारायचे, तेव्हा सत्तेत बसलेल्यांकडून एकच ठरलेलं उत्तर येतं – “प्रत्येक गोष्टीचं राजकारण करू नका!” आज आपल्याला हेच समजून घ्यायचं आहे की, सत्तेला प्रश्न विचारणं म्हणजे खरंच ‘राजकारण’ असतं का? आणि जर हे राजकारण असेल, तर मग लोकशाहीत जनतेने काय करायचं? राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नेमकं काय साध्य करायचं आहे?
गेल्या काही महिन्यांतील घटनांवर नजर टाकूया. मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. हा केवळ पुतळा नव्हता, तर महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि अस्मिता होती. जेव्हा भ्रष्टाचार आणि निकृष्ट कामावर प्रश्न विचारले गेले, तेव्हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणाले – ‘याचं राजकारण करू नका.’ बदलापूरमध्ये चिमुरड्यांवर अत्याचार झाला. संतापलेल्या पालकांनी जेव्हा न्याय मागितला, तेव्हा उत्तर आलं – ‘हे विरोधकांनी फूस लावलेले लोक आहेत, राजकारण करू नका.’ आणि आता पुण्याच्या नासरापूरची घटना. पुन्हा तेच उत्तर. प्रश्न असा पडतो की, गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना कोणीच प्रश्न विचारायचे नाहीत का? राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था वाऱ्यावर आहे, पण गृहमंत्र्यांना मात्र प्रश्न विचारलेले आवडत नाहीत.
‘राजकारण’ म्हणजे तरी नक्की काय? थोडं तांत्रिक मुद्द्यावर बोलूया. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री वारंवार ‘राजकारण’ शब्दाचा वापर ढाल म्हणून करतात. पण, एखाद्या गोष्टीचं राजकारण करणं हे घटनाबाह्य आहे का? की ते बेकायदेशीर आहे? लोकशाहीत ‘राजकारण’ हा शब्द शिवी नाही. राजकारण म्हणजे लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडणं. जर सत्ताधारी आपलं काम चोख बजावत नसतील, तर त्यांना आरसा दाखवणं हे विरोधकांचं आणि जनतेचं कर्तव्य आहे. संविधानाने आपल्याला प्रश्न विचारण्याचा अधिकार दिला आहे. मग जेव्हा फडणवीस म्हणतात की राजकारण करू नका, तेव्हा त्यांना अप्रत्यक्षपणे असं म्हणायचं असतं का की, “आम्ही काहीही करू, आम्ही कितीही अपयशी ठरू, पण तुम्ही गप्प बसा!” की त्यांना महाराष्ट्राचा बिहार करायचा आहे.
महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांची संवेदनशीलता आज चर्चेचा विषय ठरत आहे. राज्याचे गृहमंत्री म्हणून फडणवीस यांची जबाबदारी काय? जेव्हा राज्यात एखाद्या मुलीवर अत्याचार होतो, तेव्हा गृहमंत्री म्हणून त्यांनी त्या कुटुंबाच्या पाठीशी उभं राहणं अपेक्षित असतं. पण वास्तव काय आहे? फडणवीस साहेब एखाद्याच्या मुलीच्या लग्नात तासनतास वेळ देऊ शकतात, तिथे हसून फोटो काढू शकतात. पण बदलापूरच्या किंवा नसरापूरच्या पीडित कुटुंबाला भेटायला त्यांना वेळ मिळत नाही. का? तिथे गेल्यावर प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील म्हणून? हीच का तुमची संवेदनशीलता? ज्या हातांनी कायद्याचं रक्षण करायला हवं, ते हात आज केवळ राजकीय गणितं जुळवण्यात व्यस्त आहेत. राज्याचे मुख्यमंत्री स्वतः 24 तास राजकारण करतात, फोडाफोडीचं राजकारण करतात आणि तेच इतरांना सांगतात की राजकारण करू नका. हा दांभिकपणा नाही तर काय?
आता आपण आकडेवारीवर आणि वास्तवावर बोलूया. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री आहेत. पण त्यांच्या काळात गृहखात्याची काय अवस्था झाली आहे? पुण्यात कोट्यवधींचे ड्रग्ज सापडतात, पण मुख्य सूत्रधार सापडत नाहीत. राज्यात महिला आणि मुली सुरक्षित नाहीत. घरून बाहेर पडलेली मुलगी सुखरूप परत येईल याची खात्री राहिलेली नाही. भ्रष्टाचाराने इतकी सीमा ओलांडली आहे की आता महाराजांच्या पुतळ्यांमध्येही पैसे खाल्ले जात आहेत. एवढच काय तर आता भ्रष्टाचार थेट मुख्यमंत्र्यांच्या नाकाखालूनच म्हणजे मंत्रालयातूनच होतोय. या सगळ्यावर जेव्हा गृहमंत्री म्हणून त्यांना घेरलं जातं, तेव्हा ते ‘राजकारण’ या शब्दाचा ‘दम’ देतात. फडणवीस साहेब, दम देण्यापेक्षा गुन्हेगारांना जरब बसेल असं काम केलं असतं, तर आज महाराष्ट्राची ही अवस्था झाली नसती.
फडणवीस साहेब म्हणतात की ‘प्रत्येक गोष्टीचं राजकारण करू नका.’ मग जनतेनं काय करावं? राज्यात अन्याय-अत्याचाराच्या घटना तशाच सुरू ठेवायच्या? आरोपींना मोकळं रान द्यायचं? आणि जनतेनं फक्त प्रेक्षक म्हणून बघत राहायचं? जर सत्तेला प्रश्न विचारणं राजकारण असेल, तर हो, आम्ही हे राजकारण करणार! कारण हे राजकारण महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आहे, महाराष्ट्राच्या लेकीबाळींच्या सुरक्षेसाठी आहे. तुमचं गृहखातं सपशेल अपयशी ठरलं आहे आणि हे सत्य तुम्ही कितीही ‘राजकारण करू नका’ असं ओरडलात तरी लपणार नाही. महाराष्ट्राची जनता आता तुमच्या या ‘ठोकताळ्याला’ कंटाळली आहे. प्रश्न विचारल्यावर गुन्हेगारांवर कारवाई करण्याऐवजी प्रश्न विचारणाऱ्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं, हे लोकशाहीसाठी घातक आहे. देवेंद्र फडणवीस यांनी हे समजून घ्यावं की, खुर्ची ही मिरवण्यासाठी नसते, ती जबाबदारी निभावण्यासाठी असते. आणि जर तुम्ही जबाबदारी झटकणार असाल, तर जनता तुम्हाला येणाऱ्या काळात नक्कीच जाब विचारेल.




