मध्य रेल्वेवरील डोंबिवली स्थानकाजवळ सोमवारी घडलेल्या लोकल डब्याच्या रुळावरून घसरण्याच्या घटनेचा परिणाम दुसऱ्या दिवशीही कायम दिसून आला. मंगळवारी सकाळी गर्दीच्या वेळेत दिवा रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी उसळली होती. प्लॅटफॉर्मच्या दोन्ही बाजूंना आणि अगदी टोकापर्यंत प्रवासी खचाखच भरलेले दिसत होते. विशेषतः महिला प्रवाशांची संख्या मोठी असल्याचे फोटोमधून स्पष्ट झाले. हे दृश्य सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सीएसएमटीच्या दिशेने धावणाऱ्या अप मार्गावरील लोकल गाड्या आज सकाळपासून 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत आहेत. सोमवारी रात्री खर्डी स्थानकाजवळ आवश्यक तांत्रिक कामासाठी ब्लॉक घेण्यात आला होता. हा ब्लॉक पहाटे 3 वाजता संपणे अपेक्षित होते, मात्र तो सकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहिला. त्यामुळे लोकल तसेच काही एक्सप्रेस गाड्यांची वाहतूक प्रभावित झाली.
याआधी सोमवारी सकाळी डोंबिवली स्थानकाजवळ कळवा कारशेडमधून कल्याणकडे जाणाऱ्या लोकलचा प्रथम श्रेणीचा डबा रुळावरून घसरला होता. सकाळी सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. रेल्वे प्रशासनाने तातडीने दुरुस्ती मोहीम हाती घेत सुमारे दोन ते अडीच तासांच्या प्रयत्नांनंतर डबा पुन्हा रुळावर आणला. त्यानंतर वाहतूक सुरू झाली असली तरी वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत झाले होते.
यामुळे सलग दुसऱ्या दिवशीही मध्य रेल्वेच्या प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.




