IMD warning : एका बाजूला सूर्याची आग, तर दुसरीकडे पावसाचे सावट?

spot_img

प्रशासन हाय अलर्टवर, शाळा-महाविद्यालयांना सुटी जाहीर

महाराष्ट्र सध्या हवामानाच्या एका विचित्र आणि गंभीर चक्रात अडकला आहे. राज्यावर एकाच वेळी उष्णतेची लाट आणि अवकाळी पावसाचे दुहेरी संकट ओढावले असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात सूर्याने अक्षरशः आग ओकायला सुरुवात केली असून अमरावती, अकोल्यासारख्या शहरांमध्ये पारा ४४.२ अंश सेल्सिअसच्या पार गेला आहे. उष्णतेची ही तीव्रता इतकी भयानक आहे की, नागपूर जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून आज, १८ एप्रिल रोजी शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेसना सुटी जाहीर केली आहे. ‘अतिशय महत्त्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नका’, असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे, कारण उष्माघाताचे रुग्ण वाढू लागल्याने परिस्थिती चिंताजनक बनली आहे.

केवळ माणसे नाही, तर निसर्ग आणि शेतीलाही या लहरी हवामानाचा मोठा फटका बसला आहे. जळगाव जिल्ह्यात ४३ अंशांवर पोहोचलेल्या तापमानामुळे प्रसिद्ध केळीच्या बागा होरपळून निघत आहेत; केळीची पाने पिवळी पडून जळून जात असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. वाशिम आणि धाराशिवमध्येही उष्णतेने उच्चांक गाठल्याने रस्ते दुपारच्या वेळी ओस पडलेले दिसत आहेत. एकीकडे ही भाजून काढणारी उष्णता असताना, दुसरीकडे कोकण आणि धाराशिव पट्ट्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पावसाने नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळण्याची आशा असली, तरी हवामानातील हा टोकाचा बदल आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे. पुढील काही तास राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असून खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ