Rohit Shetty Residence Firing Case : ४ महिने पोलिसांना गुंगारा देणारा ‘छोटू’ अखेर आग्र्यातून जेरबंद; ९ जण गजाआड

spot_img

शुभम लोणकरच्या ‘सोशल’ पोस्टने झाला होता प्रभावित; अंडरवर्ल्डमध्ये वर्चस्व गाजवण्यासाठी रचला होता कट

बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. उत्तर प्रदेशच्या स्पेशल टास्क फोर्सच्या (STF) मदतीने पोलिसांनी प्रदीपकुमार रामसिंग उर्फ ‘छोटू’ याला आग्रा येथून बेड्या ठोकल्या आहेत. १ फेब्रुवारी २०२६ रोजी मध्यरात्री झालेल्या या गोळीबारानंतर प्रदीपकुमार गेल्या चार महिन्यांपासून पोलिसांना चकवा देत फरार होता. मात्र, तो आग्रा येथील आपल्या घरी येणार असल्याची ठोस माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला पक्की तलैया भागातून अटक केली. या अटकेसह आता या प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या वर पोहोचली आहे.

तपासादरम्यान प्रदीपकुमारने दिलेली कबुली धक्कादायक आहे. कुख्यात गुंड शुभम लोणकर याच्या सोशल मीडियावरील पोस्ट आणि गुन्हेगारी बातम्या पाहून तो भारावला होता. अंडरवर्ल्डमध्ये स्वतःचे नाव कमावण्यासाठी आणि वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी तो सनी, दीपू आणि सोनू यांसारख्या साथीदारांसह या कटात सामील झाला होता. या कामासाठी त्याला आणि इतर आरोपींना मोठ्या रक्कमेची ऑफर देण्यात आली होती. या टोळीने केवळ पैसे उकळण्यासाठीच नाही, तर संपूर्ण चित्रपटसृष्टीत दहशतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी १ फेब्रुवारीच्या रात्री रोहित शेट्टींच्या ‘शेट्टी टॉवर’वर गोळीबार केला होता. या प्रकरणात पोलिसांनी आधीच मकोका (MCOCA) अंतर्गत कडक कारवाई सुरू केली आहे.

या कटाचे धागेदोरे अत्यंत खोलवर पसरल्याचे समोर येत आहे. घटनेच्या १० दिवस आधी, म्हणजे २० जानेवारीला, सिद्धार्थ येनपुरे आणि समर्थ नावाच्या दोन आरोपींनी खास पुण्याहून मुंबईत एक दुचाकी आणली होती, जी गोळीबारासाठी वापरण्यात आली. गोळीबार करणाऱ्या मुख्य आरोपीने घटनेपूर्वी किमान ३ ते ४ वेळा रोहित शेट्टींच्या घराची रेकी केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य सूत्रधार शुभम लोणकर अद्याप फरार असून, प्रदीपकुमारच्या चौकशीतून त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग मोकळा होईल अशी आशा पोलिसांना आहे. सध्या प्रदीपकुमारला ट्रान्झिट रिमांडवर मुंबईत आणण्यात येत असून, या गुन्ह्यातील आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ