भररस्त्यात वाढदिवस आणि पोलिसांची उपस्थिती; तपासाच्या निःपक्षपातीपणावर मोठे प्रश्नचिन्ह, उद्या पालकमंत्र्यांची महत्त्वाची बैठक
अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील १८० हून अधिक तरुणींचे लैंगिक शोषण आणि सुमारे ३५० अश्लील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर (१९ वर्षे) सध्या पोलीस कोठडीत आहे. मात्र, या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच आरोपीचा एक धक्कादायक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्याने खळबळ उडवून दिली आहे. डिसेंबर २०२५ मधील या व्हिडिओमध्ये आरोपी अयाज भररस्त्यात आपला वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. संतापजनक बाब म्हणजे, यावेळी कर्तव्यावर असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि दोन कर्मचारी केवळ तिथे उपस्थितच नव्हते, तर त्यांनी आरोपीला स्वतःच्या हाताने केक भरवून वाढदिवसाचा आनंद साजरा केला. भररस्त्यात होणारी आतषबाजी आणि गोंधळ थांबवण्याऐवजी पोलीसच त्यात सामील झाल्याने, पोलिसांचे आरोपीशी असलेले ‘घनिष्ठ’ संबंध आता चव्हाट्यावर आले आहेत.
या व्हिडिओमुळे संताप व्यक्त केला जात असून, आरोपीला पोलिसांचे संरक्षण होते का? असा गंभीर सवाल पीडित कुटुंबीयांकडून विचारला जात आहे. ज्या पोलिसांसोबत आरोपी केक खाऊन वाढदिवस साजरा करतो, तेच पोलीस या प्रकरणाचा निष्पक्ष तपास कसा करतील, यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आता राज्य सरकार ॲक्शन मोडमध्ये आले आहे. अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उद्या, १८ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, एसआयटी प्रमुख शुभम कुमार आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक घेणार आहेत. या बैठकीनंतर बावनकुळे स्वतः परतवाडा येथे भेट देऊन पीडितांच्या बाजूने आणि तपासाच्या प्रगतीबाबत आढावा घेणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अयाज हा स्नॅपचॅट आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे शोषण करायचा आणि नंतर अश्लील व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना ब्लॅकमेल करायचा. या रॅकेटचे धागेदोरे आंतरराज्यीय स्तरावर असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, पोलीस आणि आरोपीचा हा ‘बर्थडे व्हिडिओ’ समोर आल्याने आता दोषी पोलिसांवरही कारवाईची टांगती तलवार आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले असले, तरी व्हायरल व्हिडिओमुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाली असून, सामान्य जनतेचा विश्वास संपादन करणे हे आता पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरणार आहे.




