कलकत्ता: आयपीएल २०२६ च्या १९ व्या मोसमात क्रिकेट चाहत्यांना एकामागून एक अटीतटीचे सामने पाहायला मिळत आहेत. गुरुवारी गुजरातने दिल्लीला १ धावेने हरवल्यानंतर, शुक्रवारी (९ एप्रिल) लखनौ सुपर जायंट्सने कोलकाता नाईट रायडर्सवर शेवटच्या चेंडूवर थरारक विजय मिळवला. पराभवाच्या छायेत असलेल्या लखनौसाठी ‘अनकॅप्ड’ युवा खेळाडू मुकुल चौधरी तारणहार ठरला. या अवाक करणाऱ्या विजयानंतर संघमालक संजीव गोयंका यांनी मैदानात येऊन मुकुलचे ज्या पद्धतीने कौतुक केले, तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
कोलकाताने विजयासाठी दिलेल्या १८२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनौची अवस्था एकवेळ ५ बाद १०४ अशी बिकट झाली होती. अब्दुल समद बाद झाल्यानंतर मुकुल चौधरी सातव्या क्रमांकावर मैदानात उतरला. तेव्हा लखनूला विजयासाठी ४३ चेंडूत ७८ धावांची मोठी गरज होती. कोणत्याही दबावाला बळी न पडता मुकुलने २७ चेंडूत नाबाद ५४ धावांची वादळी खेळी केली. यात त्याने ७ उत्तुंग षटकार आणि २ चौकार ठोकले. शेवटच्या षटकात १४ धावा हव्या असताना आणि अखेरच्या चेंडूवर १ धाव शिल्लक असताना मुकुलने आवेश खानच्या सोबतीने धाव पूर्ण केली आणि ईडन गार्डन्सवर लखनौच्या विजयाचा झेंडा फडकावला.
लखनौच्या प्रत्येक सामन्याला हजेरी लावणारे संजीव गोयंका याही वेळी स्टेडियममध्ये उपस्थित होते. सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगल्याने त्यांची धाकधूक वाढली होती, मात्र मुकुलने अशक्यप्राय विजय मिळवून देताच गोयंकांनी देवाचे आभार मानले. सामना संपताच त्यांनी थेट मैदानावर धाव घेतली आणि मुकुल चौधरीचे अभिनंदन केले. त्यांनी मायेने मुकुलच्या चेहऱ्यावरून हात फिरवून त्याचे कौतुक केले, ज्याने चाहत्यांची मने जिंकली. मुकुल व्यतिरिक्त आयुष बदोनीने ३४ चेंडूत ५४ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले, तर गोलंदाजीत मोहम्मद शमीने टिच्चून मारा केला.
लखनौ सुपर जायंट्सचा या मोसमातील हा सलग दुसरा विजय ठरला आहे. मध्यफळीत एडन मार्करम (२२) आणि मिचेल मार्श (१५) स्वस्तात बाद झाल्यानंतर संघ संकटात होता, पण मुकुलच्या विस्फोटक फलंदाजीने सामन्याचे चित्र पालटले. कोलकाताकडून वैभव अरोरा आणि अनुकुल रॉय यांनी प्रत्येकी २ बळी घेतले, मात्र मुकुलच्या वादळापुढे त्यांची सर्व रणनीती फोल ठरली. या विजयामुळे लखनौने गुणतालिकेत आपली पकड मजबूत केली असून मुकुल चौधरी आता आयपीएलचा नवा ‘फिनिशर’ म्हणून चर्चेत आला आहे.




