स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीच्या (Mahavikas) घटक पक्षांनी आपापल्या स्तरावर तयारी सुरू केली असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील (Anil Patil) यांनी जळगावात केलेल्या वक्तव्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. अनिल पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, जर जळगाव जिल्ह्यात महायुती एकत्रितपणे निवडणूक लढवण्यास तयार झाली तर ठीक, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुका लढवून आपली ताकद दाखवेल. ते म्हणाले, “लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी महायुतीसाठी प्रचार केला. आता स्थानिक निवडणुकांमध्ये त्यांच्याविरोधात प्रचार करणं योग्य नाही.
महायुतीतील प्रत्येक पक्षानं आपल्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखला पाहिजे. युती झाली तर बरं, नाहीतर आम्ही सर्व जागांवर निवडणूक लढवू आणि आमच्या क्षमतेनुसार यश मिळवू.” दरम्यान, भाजपनं विभागीय बैठका घेऊन तयारीचा आढावा सुरू केला आहे, तर शिंदे गटाच्या शिवसेनेनंही कार्यकर्त्यांना सक्रिय होण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, महायुती एकत्र लढणार की स्वतंत्रपणे, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. अनिल पाटील यांच्या या वक्तव्यानं महायुतीच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून, जळगावच्या स्थानिक निवडणुकांमध्ये नवे राजकीय समीकरणं पाहायला मिळण्याची शक्यता आहे.




