बॉलिवूड सेलिब्रिटींकडून मल्होत्रा कुटुंबाचे सांत्वन; फॅशन विश्वातील प्रवासाचा भक्कम आधार तुटला
भारतीय फॅशन विश्वातील चमकते नाव मनीष मल्होत्रा यांच्या मातोश्री गरिमा मल्होत्रा यांचे मुंबईतील राहत्या घरी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, या दुःखद बातमीने मल्होत्रा कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मनीष यांच्या फॅशन क्षेत्रातील कारकिर्दीत त्यांच्या आईचा मोलाचा वाटा होता. २०१९ मध्ये वडिलांच्या निधनानंतर, आई हीच मनीष यांची सर्वात मोठी शक्ती आणि आधार होती. ‘मदर्स डे’च्या निमित्ताने मनीष यांनी आपल्या आईप्रती कृतज्ञता व्यक्त करताना म्हटले होते की, त्यांच्या आईनेच त्यांना चित्रपट आणि फॅशनच्या जगात पाऊल ठेवण्यासाठी प्रोत्साहन दिले होते.
गरिमा मल्होत्रा यांच्या निधनाची बातमी समजताच बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार मनीष यांच्या घरी पोहोचले आहेत. यामध्ये करण जोहर, मलायका अरोरा, अर्जुन कपूर, करिश्मा कपूर, वरुण धवन, सोनाली बेंद्रे आणि उर्मिला मातोंडकर यांसारख्या सेलिब्रिटींचा समावेश आहे. लहानपणी आईच्या साड्यांपासून कपडे बनवण्याच्या आवडीला गरिमा यांनीच खतपाणी घातले होते. फाळणीपूर्वीच्या काळातील असलेल्या गरिमा यांनी मनीषच्या शिक्षणाकडे आणि व्यक्तिमत्त्व विकासाकडे नेहमीच विशेष लक्ष दिले होते. आज त्यांच्या जाण्याने मनीष मल्होत्रा यांच्या आयुष्यातील एक मार्गदर्शक प्रकाश विझला आहे.




