ओतूर,प्रतिनिधी : रमेश तांबे
ओतूर (ता.जुन्नर) येथील गाडगे महाराज विद्यालयात सुरू असलेल्या दहावीच्या परीक्षा केंद्रातील वर्गात घुसून परीक्षार्थी
विद्यार्थ्यावर अल्पवयीन मुलाने कोयत्याने वार केल्याने हा विद्यार्थी जखमी झाला आहे.जुन्या वादातून हा हल्ला झाला असल्याचे बोलले जाते.दरम्यान घडलेल्या या घटनेमुळे ओतूर आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सदरची घटना सोमवारी दि.१६ रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली असून, ओतूर पोलिसांनी
अल्पवयीन मुलाच्या तक्रारीवरून ऋतीक सचिन सोनवणे रा.डिंगोरे ता.जुन्नर जि. पुणे तसेच त्याच्या बरोबर असलेल्या चार अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, ओतूर पोलिसांनी अल्पवयीन मुलासह चार जणांना ताब्यात घेतले आहे. सोमवारी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत इतिहासाचा पेपर होता.सकाळी साडे दहा वाजता नेहमीप्रमाणे पेपरसाठी शाळेची बेल झाल्यानंतर,परीक्षार्थी विद्यार्थी आपापल्या वर्गात गेले. त्यावेळेस विद्यार्थ्यावर हल्ला करणारा युवक देखील गळ्यात शाळेचे दप्तर सॅक अडकून त्याच्या चार साथीदारांसह वर्गात गेला.आणि परीक्षा वर्गाचा दरवाजा लावून दप्तर ठेवण्याच्या सॅकमधून कोयता काढला आणि परीक्षार्थी विद्यार्थ्यावर हल्ला चढविला.संबंधित विद्यार्थ्यांने हा हल्ला आपल्या हातावर झेलल्याने मोठा अनर्थ टळला.या घटने दरम्यान इतर परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी आरडा-ओरडा केल्याने हल्ला करणाऱ्या अल्पवयीन मुलास पोलिसांनी कोयत्यासह ताब्यात घेतले आहे.
घडलेला संपूर्ण प्रकार CCTVमध्ये कैद झाला आहे.दरम्यान रात्री उशिरापर्यंत या घटनेची चौकशी सुरू होती.ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहु थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नरेंद्र गोराणे हे पुढील तपास करीत आहेत.




