कर्जत-नेरळ आणि कर्जत-खोपोली दरम्यान लोकल बंद, प्रवाशांना वेळापत्रक तपासण्याचे आवाहन
दिवाळी अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपली असताना, मुंबईकरांचा खरेदीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. पण, मुंबईची लाईफलाइन असलेल्या मध्य रेल्वेवर आजपासून तब्बल 30 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे, ज्यामुळे शहरातील या उत्साही खरेदीदारांना आणि रोजच्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो. या मेगाब्लॉकमुळे कर्जत-नेरळ (Karjat Nerul) आणि कर्जत-खोपोली (Karjat Khopoli) दरम्यानच्या सर्व लोकल गाड्या पूर्णपणे बंद राहणार आहेत, ज्यामुळे दिवाळीपूर्वीच्या या महत्त्वाच्या वीकेंडला मुंबईकरांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे.हा मेगाब्लॉक नेरळ ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्यांनाही उशीर करेल.
रविवारी, 12 ऑक्टोबर 2025 रोजी, ब्लॉक संपल्यानंतर संध्याकाळी 7:43 वाजता कर्जत येथून सीएसएमटीसाठी पहिली लोकल सुटेल. याशिवाय, पळसधरी ते चौक दरम्यान ट्रॅफिक ब्लॉकमुळे मेल, एक्सप्रेस आणि उपनगरी गाड्यांवरही परिणाम होईल. कर्जत, खोपोली, नेरळ, बदलापूर आणि अंबरनाथ येथे काही गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन आणि ओरिजिनेशन होईल, ज्यामुळे वेळापत्रकात बदल झाले आहेत. काही एक्सप्रेस गाड्या कल्याण किंवा दौंड मार्गे वळवण्यात आल्या आहेत.मध्य रेल्वेने प्रवाशांना प्रवासापूर्वी सुधारित वेळापत्रक तपासण्याचे आवाहन केले आहे. सुरक्षिततेसाठी देखभाल कार्य आवश्यक असल्याचे सांगत, रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल खेद व्यक्त केला आहे. मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील निला यांनी यासंदर्भात अधिकृत पत्रक प्रसिद्ध केल्याची माहिती दिली आहे. मुंबईकरांना या सणासुदीच्या काळात अडचणी टाळण्यासाठी प्रवासाचे काळजीपूर्वक नियोजन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.




