‘द हंड्रेड’ लिलावातील ऐतिहासिक बोली ठरली चर्चेचा विषय; नेटीझन्सकडून तीव्र संताप व्यक्त
आयपीएल २०२६ चा हंगाम सुरू होण्यापूर्वीच सनरायझर्स हैदराबादच्या मालक काव्या मारन एका मोठ्या वादात अडकल्या आहेत. इंग्लंडमध्ये पार पडलेल्या ‘द हंड्रेड’ लीगच्या पहिल्या ऐतिहासिक लिलावात, काव्या मारन यांच्या ‘सनरायझर्स लीड्स’ फ्रँचायझीने पाकिस्तानी फिरकीपटू अबरार अहमदला तब्बल २.३ कोटी रुपयांना (१,९०,००० पौंड) विकत घेतले. भारतीय मालकीच्या संघाने पाकिस्तानी खेळाडूवर लावलेल्या या मोठ्या बोलीमुळे सोशल मीडियावर वादाचा धुराळा उडाला असून काव्या मारन यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.
या वादात भर पडली ती म्हणजे, लिलावानंतर काही तासांतच ‘सनरायझर्स लीड्स’चे अधिकृत ‘X’ (ट्विटर) खाते अचानक निलंबित करण्यात आले. नियमांचे उल्लंघन केल्याचे कारण दाखवत हे खाते बंद करण्यात आल्याने क्रिकेट वर्तुळात खळबळ माजली आहे. नेमक्या कोणत्या चुकीमुळे ही कारवाई झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. विशेष म्हणजे, भारतीय मालकीचे संघ पाकिस्तानी खेळाडूंना घेणार नाहीत, अशा चर्चांना पूर्णविराम देत सनरायझर्सने अबरार अहमदला ताफ्यात सामील करून घेतले.
लिलावापूर्वी ईसीबीने स्पष्ट केले होते की, खेळाडूंची निवड राष्ट्रीयत्वावर नव्हे तर प्रतिभेवर केली जाईल. या लिलावात एकूण १३ पाकिस्तानी खेळाडू सहभागी झाले होते, मात्र केवळ अबरार अहमद आणि उस्मान तारिक (बर्मिंगहॅम फिनिक्स) या दोघांनाच खरेदीदार मिळाले. काव्या मारन यांच्या या धाडसी पण वादग्रस्त निर्णयामुळे आगामी काळात सनरायझर्स ग्रुपच्या अडचणी वाढणार की हा वाद शांत होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




