अकोल्यात तापमान ४१ अंशांवर; विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज.
महाराष्ट्रात सध्या उन्हाची तीव्रता वाढत असून राज्यातील बहुतांश भागात उष्ण आणि कोरडे हवामान जाणवत आहे. विशेषतः किनारपट्टी भागात उकाड्यासोबतच दमट वातावरणही जाणवत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस राज्यात पावसाची शक्यता नसली, तरी १३ आणि १४ मार्च रोजी विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.
मुंबई, ठाणे, पालघर आणि संपूर्ण कोकण पट्ट्यात सध्या उष्ण आणि दमट वातावरण कायम आहे. आज पावसाची शक्यता नसली, तरी काही भागांत उष्णतेच्या लाटेचा प्रभाव जाणवू शकतो. दुसरीकडे पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये तापमानात वाढ झाली आहे. आज हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून १४ मार्चपासून काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
पुणे वेधशाळेचे हवामानतज्ज्ञ सखा सानप यांच्या माहितीनुसार, संपूर्ण महाराष्ट्रात तापमानात लक्षणीय वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांनी बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्या राज्यात अकोला जिल्ह्यात सर्वाधिक ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे, तर पुण्यात तापमान ३९ अंशांपर्यंत पोहोचले आहे.
मुंबईसह किनारपट्टी भागातही उष्णतेचा प्रभाव वाढला आहे. काही ठिकाणी पहाटेच्या वेळी प्रदूषणामुळे धुक्यासारखा थर दिसून आला, मात्र त्यातून कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. विदर्भातही तापमान ४० अंशांच्या आसपास पोहोचले आहे. पुढील दोन दिवसांत मुंबई आणि कोकणात उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सध्या गुजरात आणि महाराष्ट्राच्या भागात प्रतिचक्रवर्ती हवामान परिस्थिती निर्माण झाल्यामुळे उष्णतेची तीव्रता वाढल्याचे सांगितले जात आहे. मात्र संपूर्ण राज्यात उष्णतेची लाट नसून विदर्भ आणि कोकणात काही ठिकाणी त्याचा परिणाम जाणवू शकतो. तसेच १४ मार्चनंतर विदर्भ आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.




