‘होणार सून मी ह्या घरची’ आणि ‘मुरांबा’ या लोकप्रिय मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर करणारा अभिनेता शशांक केतकर सोशल मीडियावर नेहमीच विविध सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर आपलं मत स्पष्टपणे मांडताना दिसतो. याआधीही अनेक विषयांवर भाष्य करत त्याने प्रशासनावर टीका केली होती. आता पुन्हा एकदा त्याने मुंबईतील रस्त्यांच्या खराब अवस्थेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
शशांकने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत मड आयलंड परिसरातील रस्त्यांची दयनीय परिस्थिती दाखवली आहे. रस्त्यावर असलेले मोठे खड्डे आणि उघडी गटारं यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याचं त्याने सांगितलं. या समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचंही त्याने नमूद केलं.
व्हिडीओसोबतच्या कॅप्शनमध्ये शशांकने म्हटलं आहे की, रस्ता मोठा हायवे असो किंवा गावातील छोटा रस्ता असो, त्यावरून प्रवास करणारा प्रत्येक माणूस जिवंत असतो आणि त्याच्या सुरक्षेची जबाबदारी महत्त्वाची असते. अनेक चालक वाहतुकीचे नियम पाळत नाहीत हे मान्य असलं, तरी अशा उघड्या गटारांमुळे अपघात झाला आणि जीवितहानी झाली तर त्याला जबाबदार कोण, असा सवालही त्याने उपस्थित केला.
यासोबतच “मुंबई स्पिरिट” या नावाखाली नागरिकांनी प्रत्येक समस्या सहन करायची का, असा प्रश्नही त्याने उपस्थित केला. आपल्या देशात माणसाच्या जीवाला फारशी किंमत उरलेली नाही, असा अनुभव वारंवार येतो, असंही त्याने म्हटलं. तसेच या मुद्द्यावर तातडीने कारवाई होईल आणि संभाव्य अपघात टाळले जातील, असा विश्वासही त्याने प्रशासनावर व्यक्त केला आहे.




