विश्वचषक विजयानंतर गर्लफ्रेंड महिका शर्मासोबत मैदानात केलेल्या सेलिब्रेशनमुळे तिरंग्याचा अपमान झाल्याचा आरोप.
टी-20 विश्वचषक 2026 मध्ये न्यूझीलंडचा पराभव करून भारताने जेतेपद पटकावल्यावर भारतीय खेळाडूंनी मैदानावर जल्लोषात सेलिब्रेशन केले. मात्र या आनंदसोहळ्यात भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि त्याची कथित गर्लफ्रेंड महिका शर्मा यांचे मैदानावरील काही क्षण सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत.
विजयानंतर हार्दिकच्या खांद्यावर भारतीय तिरंगा होता आणि गळ्यात विश्वचषकाचे पदक होते. या दरम्यान तो महिका शर्मासोबत मैदानात फिरताना, नाचताना आणि एकमेकांना मिठी मारताना दिसला. महिकाने हार्दिकच्या गालावर किस केल्याचे काही व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तसेच एका व्हिडिओमध्ये दोघेही पुरस्कार वितरणासाठी उभारलेल्या स्टेजवर पडलेले दिसत असल्याचेही पाहायला मिळते.
या सेलिब्रेशनदरम्यान तिरंग्याचा अनादर झाला असल्याचा आरोप करत पुण्यातील वकील वाजिद खान यांनी हार्दिक पांड्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ही एफआयआर स्वीकारण्यात आली आहे. तक्रारीनुसार, भारतीय ध्वजात गुंडाळून नाचणे आणि मैदानावर पडणे हे राष्ट्रीय ध्वजाचा अपमान असल्याचे म्हटले गेले आहे.
दरम्यान, या घटनेवर सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया उमटत असून काही जणांनी नाराजी व्यक्त केली आहे, तर काहींनी हा फक्त आनंदाचा क्षण असल्याचे सांगत हार्दिकचे समर्थनही केले आहे.




