द रिव्हेंज’ (धुरंधर 2) 19 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. मात्र अधिकृत रिलीजच्या एक दिवस आधी म्हणजे 18 मार्चच्या संध्याकाळी काही थिएटरमध्ये विशेष पेड प्रिव्ह्यू शो आयोजित करण्यात आले आहेत. रिलीजला अजून आठवडा बाकी असतानाही या प्रिव्ह्यू शोसाठी प्रेक्षकांकडून मोठी मागणी दिसत आहे. अनेक ठिकाणी शो आधीच हाऊसफुल झाल्याचे दिसून येत आहे.
या प्रिव्ह्यू शोसाठी तिकिटांचे दरही नेहमीपेक्षा खूप जास्त ठेवण्यात आले आहेत. देशातील मोठ्या शहरांतील मल्टिप्लेक्समध्ये साध्या फॉरमॅटच्या तिकिटांची किंमत सुमारे 600 ते 900 रुपयांदरम्यान आहे. IMAX शोसाठी काही ठिकाणी ही किंमत 1000 रुपयांपेक्षाही जास्त आहे. लक्झरी रेक्लायनर सीटसाठी तर प्रेक्षकांना मोठी रक्कम मोजावी लागत आहे. मुंबईतील बोरिवली येथील INOX मेगाप्लेक्समध्ये रेक्लायनर सीटची किंमत सुमारे 3100 रुपये आहे, तर दिल्लीतल्या PVR सिलेक्ट सिटी वॉकमध्ये ही किंमत 2400 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. एवढ्या महागड्या तिकिटांनंतरही बहुतेक शो सोल्ड आऊट झाले आहेत.
चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगलाही मोठा प्रतिसाद मिळत आहे. रिलीजच्या आठ दिवस आधीच सुमारे तीन लाख तिकिटांची विक्री झाली असून भारतात जवळपास 15 कोटी रुपयांची कमाई झाली आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रीमियर कलेक्शनच्या बाबतीत बॉलिवूडमधील आघाडीच्या चित्रपटांमध्ये स्थान मिळवू शकतो. तज्ज्ञांच्या मते, लवकरच हा आकडा 25 कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
दिग्दर्शक आदित्य धर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटात रणवीर सिंग पुन्हा एकदा भारतीय गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय आर. माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, डॅनिश पंडोर, राकेश बेदी आणि सारा अर्जुन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘धुरंधर’चा पहिला भाग प्रचंड यशस्वी ठरला होता आणि जगभरात सुमारे 1300 कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यामुळे आता ‘धुरंधर 2’कडूनही बॉक्स ऑफिसवर मोठ्या यशाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




