कमी वयाचा बॉयफ्रेंड की केवळ मित्र? ५२ वर्षीय मलायका आणि ३३ वर्षीय हर्ष मेहताच्या नात्यावर पुन्हा एकदा चर्चांना उधाण
बॉलिवूडची ‘स्टाईल आयकॉन’ मलायका अरोरा तिच्या अभिनयापेक्षा खासगी आयुष्यामुळेच जास्त प्रकाशझोतात असते. गेल्या काही दिवसांपासून मलायकाचे नाव हिरे व्यापारी हर्ष मेहता सोबत जोडले जात असून, त्यांच्या रोममधील फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ माजवली होती. मात्र, रविवारी संध्याकाळी मलायकाच्या नवीन रेस्टॉरंट ‘स्वीनी बॉम्बे’ (Sweeny Bombay) च्या लाँच पार्टीत एका वेगळ्याच ‘मिस्ट्री मॅन’सोबतचा तिचा डान्स व्हिडिओ समोर आल्याने नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. या व्हिडिओमध्ये मलायका ज्या तरुणासोबत थिरकताना दिसत आहे, तो हर्ष मेहता नसून दुसराच कोणीतरी असल्याचे पाहून सोशल मीडियावर तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
तपास केला असता समोर आले की, मलायकासोबत दिसणारा तो तरुण दुसरा तिसरा कोणी नसून ‘स्प्लिट्सविला’ फेम सोराब बेदी आहे. दोघांमधील केमिस्ट्री पाहून अनेक युझर्सनी सोराब हाच मलायकाचा नवा जोडीदार आहे का, असा प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. परंतु, सत्य काही वेगळंच आहे. सोराबने स्वतः इन्स्टाग्रामवर या पार्टीचे फोटो शेअर करून मलायकाचे अभिनंदन केले आहे, ज्यावरून हे स्पष्ट होते की ते केवळ चांगले मित्र आहेत. सोराब केवळ या ग्रँड लाँचचा एक भाग म्हणून तिथे उपस्थित होता आणि त्यांच्यात कोणतेही प्रेमसंबंध नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, या संपूर्ण पार्टीत मलायकाचा कथित बॉयफ्रेंड हर्ष मेहता देखील हजर होता. पार्टी संपल्यानंतर मलायका आणि हर्ष दोघेही एकाच गाडीतून बाहेर पडताना कॅमेऱ्यात कैद झाले, ज्यामुळे त्यांच्या डेटिंगच्या बातम्यांवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. सध्या चर्चेचा विषय ठरत आहे तो म्हणजे या दोघांमधील वयाचे अंतर. ५२ वर्षीय मलायका आणि ३३ वर्षीय हर्ष यांच्यात तब्बल १९ वर्षांचे अंतर असून, अरबाज खान आणि अर्जुन कपूरनंतर आता मलायकाच्या आयुष्यात हर्षची एन्ट्री झाल्याचे निश्चित मानले जात आहे.




