ओतूर,प्रतिनिधी : रमेश तांबे
जुन्नर तालुक्यातील सितेवाडी गावच्या हद्दीत गणेशखिंड घाटामध्ये उबेर चालकाचा अज्ञात व्यक्तीने खुन केल्याची घटना दि.५ ते ७ मार्च च्या दरम्यान घडली होती. या घटनेची फिर्याद ओतूर पोलिसात दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या खुनाचा तपास करून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
नासीर अहम्मद सलामतुल्ला अन्सारी वय-२६ वर्षे मुळ रा. शेरकोट ता. धामपुर जि. बिजनोर राज्य-उत्तर प्रदेश सध्या रा. रूम नं. १७७१, समता नगर, सेक्टर नं. १, ऐरोली नाका, गणेश बार जवळ, नवी मुंबई जि.ठाणे असे खून झालेल्या उबेर चालकाचे नाव आहे. आदर्श चंद्रकांत भालेराव वय २१ वर्षे व्यवसाय- शिक्षण, रा. संकेश्वर किस्टल सोसायटी, गणेश विदयालया जवळ टिटवाळा ईस्ट ता. कल्याण जि.ठाणे असे आरोपीचे नाव आहे. याबाबत मोहम्मद अमिर सलामतुल्ला अन्सारी याने ओतूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दि.५ मार्च रोजी दुपारी ते दि.७ मार्च रोजी सायंकाळच्या दरम्यान मौजे सितेवाडी, ता. जुन्नर जि.पुणे गावच्या हद्दीत गणेशखिंड घाटामध्ये पांढऱ्या रंगाची ईर्टीगा गाडी क. एम.एच.०३ डी.व्ही.६४०३ यावरील चालक याचा अज्ञात व्यक्तीने, अज्ञात कारणासाठी खुन केला असल्याबाबतची फिर्याद मयताचा भाऊ मोहम्मद अमिर सलामतुल्ला अन्सारी याने दिल्याने दि.८ मार्च रोजी अज्ञात आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याच्या तपासादरम्यान ईटींगा गाडीची उबेर कंपनिकडे माहिती काढली असता दि,५ मार्च रोजी दुपारी अंदाजे तीन वाजता सदरची गाडी आदर्श भालेराव याने टिटवाळा ते जुन्नर अशी बुकींग केली असल्याचे निष्पन्न झाले. सदरच्या गाडीचे जी.पी.एस चेक केले असता सदरची गाडी ही जुन्नर या ठिकाणी न जाता मयताची बॉडी ज्या ठिकाणी मिळाली आहे त्या ठिकाणापासून काही अंतरावर जावून पुन्हा पाठीमागे येवुन टिटवाळा या ठिकाणी थांबली असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदरची गाडी आरोपी आदर्श भालेराव याने बुकींग केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून,सदरची गाडी बेवारस मिळुन आल्यांतर,त्यात मोठया प्रमाणात रक्ताचे डाग मिळुन आल्याने स्थानिक गुन्हे शाखा ठाणे ग्रामीण यांनी गुन्हा दाखल करण्यापुर्वी तपास केला असता,सदरचा गुन्हा हा आरोपी आदर्श भालेराव याने केला असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्यास ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
आरोपी आदर्श भालेराव याने मयत इसम नासीर अहम्मद सलामतुल्ला अन्सारी चालवत असलेली ईर्टीगा गाडी ही टिटवाळा अखरपाडा येथून जुन्नर या ठिकाणी जाण्यासाठी उबेर या अँपचा वापर करून दि.५ मार्च रोजी तीन वाजता ऑनलाईन बुक केली होती. यातील आरोपी व मयत इसम सदरच्या गाडीमधुन टिटवाळा येथून तीन ते साडेतीन वाजण्याच्या दरम्यान जुन्नर या ठिकाणी येण्यासाठी निघाले होते. माळशेज घाटमार्गे सितेवाडी ता.जुन्नर जि.पुणे गावच्या हद्दीतील गणेशखिंड या ठिकाणी आल्यानंतर मयत इसम नासीर अहम्मद सलामतुल्ला अन्सारी याने,त्याच्या ताब्यातील ईर्टिगा गाडी गणेशखिंड घाटात लघुशंकेसाठी थांबवली, त्यानंतर तो पुन्हा चालकाचे सिटवर बसला त्यावेळी आरोपी आदर्श भालेराव हा पाठीमागच्या सिटवर बसलेला होता. यातील मयत नासीर अन्सारी याने गाडीच्या काचा लावून,आरोपी आदर्श भालेराव
याच्याकडे पैशांची मागणी करून चाकुने धमकावण्यास सुरूवात केली.त्यास पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे आरोपी व मयत इसम यांच्यात गाडीमध्येच झटापट सुरू झाली. त्यानंतर आरोपीने मयत इसमाच्या हातातील चाकु हिसकावून घेवून त्याच्या मानेवर खोलवर वार केला. त्यानंतर आरोपीने मयत इसमास मागच्या सिटवर ओढुन त्याच्यावर चाकुने वार करून, त्याचा गाडीतच खुन केला आहे. मयताचा मृत्यु झाल्यानंतर आरोपीने सदरची गाडी गुन्हा घडलेल्या ठिकाणापासुन काही अंतरावर पुढे नेली व तेथुन पुन्हा वळवुन ज्या ठिकाणी गुन्हा घडला आहे तेथे थांबवली. त्यानंतर आरोपी हा गाडीच्या खाली उतरला व त्याने मयत इसमास गाडीच्या बाहेर ओढुन त्याची बॉडी सितेवाडी बाजुकडे जाणारे रस्त्याचे डावे बाजूस सिमेंटच्या कठड्यावरून खाली टाकुन दिली. आरोपी हा मयताच्या ताब्यातील गाडी घेवुन माळशेज घाट मार्गे टिटवाळा या ठिकाणी गेला व टिटवाळा ते गोवेलीचे दरम्यान जिल्हा ठाणे येथे सदरची गाडी रस्त्यावर उभी करून तो पळुन गेला असल्याची कबुली पोलिसांना दिली.
आरोपी आदर्श भालेराव यास ताब्यात घेवुन त्यास अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने सदरच्या आरोपीस दि.१२ मार्च रोजी पर्यंत पोलीस कस्टडी मंजुर केली आहे. सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे,जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक एल.जी.थाटे, पोलीस उपनिरीक्षक संदिप आमणे,पो.हवा.नरेंद्र गोराणे,पो.हवा. नामदेव बांबळे, पो.हवा.बाळशिराम भवारी,पो.हवा. देविदाव खेडकर, पो.हवा.भरत सुर्यवंशी, पो.कॉ.रोहीत बोंबले यांनी केली आहे.




