ओतूर,प्रतिनिधी : रमेश तांबे
जुन्नर तालुक्यातील खामगांव (मांगणेवाडी) येथील शासकीय राखीव वनात बेकायदेशीरपणे प्रवेश करून, वनास आग लावल्याने मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र जळून वृक्ष संपदा तसेच वन्यप्राण्यांचे अधिवास नष्ट झाल्याने यातील आरोपींच्या विरूध्द भारतीय वन अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांपैकी एकास दोन दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले असल्याचे जुन्नरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी सांगितले तसेच या गुन्ह्यात एक विधीसंघर्षीत बालक असल्याने,अधिक माहितीसाठी त्याची चौकशी सुरू आहे व इतर दोन आरोपी वनविभागाला चकवा देऊन फरार झाले असून, जुन्नर वनविभाग आरोपींचा शोध घेत आहे. या गुन्ह्यातील करण हरीभाऊ पारधी या आरोपीस मे.प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, जुन्नर यांचे समोर हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मौजे मांगणेवाडी (खामगाव) ता. जुन्नर येथील शासकीय वनात शनिवारी दि.७ रोजी सायंकाळच्या सूमारास बेकायदेशीरपणे प्रवेश करून, वनास आग लावल्याने मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र जळून वृक्ष संपदा तसेच वन्यप्राण्यांचे अधिवास नष्ट झाल्याने आरोपी करण हरीभाऊ पारधी, एक विधीसंघर्षीत बालक व अन्य तीन जणांनी मौजे खामगाव राखीव वनकक्ष क्र. ८४ मध्ये वनपाल आलमे हे आपल्या अधिनिस्त वनकर्मचाऱ्यांसह नियमित गस्तीसाठी गेले असता सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास खामगाव (मांगणेवाडी) चे राखीव वनक्षेत्रामध्ये ठिकठिकाणी वणवा लागल्याचे त्यांना दिसून आल्याने, त्यांनी तात्काळ वणवा लागल्याचे ठिकाणी धाव घेतली असता, या ठिकाणी ४ इसम राखीव वन क्षेत्रास आग लावताना दिसून आले. त्यातील दोन इसम डोंगराच्या वरच्या भागात ठिकठिकाणी वणवा लावत,खामगाव मांगणेवाडी कडून माणिकडोह च्या दिशेने जाताना दिसले व अन्य दोन इसम डोंगराच्या पायथ्या कडील बाजुने राखीव वनक्षेत्रात दोन ते तीन जागेवर वणवा लावत माणिकडोह च्या दिशेने चालले होते. त्यावेळी वनपाल आलमे व त्यांच्या अधिनिस्त वनकर्मचाऱ्यांनी मोठ्या शिताफीने त्यांचा पाठलाग करून, त्यापैकी दोन इसम नामे करण हरीभाऊ पारधी, अक्षय संतोष जाधव यांना पकडले. तथापी अन्य दोन इसम हे अंधाराचा फायदा घेऊन घटना स्थळावरून फरार झाले असून त्याचा शोध वनविभागाचे पथके घेत आहेत.
रविवार दि.८ रोजी ताब्यातील अटकेतील आरोपी करण हरीभाऊ पारधी यास मे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, जुन्नर यांचे समोर हजर केले असता मा. न्यायालयाने त्यास दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रकरणी शासनाच्या वतीने जुन्नरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण व विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता एस.एस.अवचर यांनी युक्तीवाद केला.
यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी चव्हाण म्हणाले की शासकीय राखीव वनात अपप्रवेश करणे, वनास आग लावणे ही कृत्ये भारतीय वन अधिनियम १९२७ च्या तरतुदींचे उल्लंघन असून अशा कृत्याकरिता दोन वर्षा पर्यंतच्या कारवासाची तसेच दहा हजार रूपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद असून सदर गुन्हा अजामीन पात्र स्वरूपाचा आहे.
सदरची कारवाई पुणे प्रादेशिक वनविभागाचे वनसंरक्षक आशिष ठाकरे,जुन्नरचे उपवनसंरक्षक प्रशांत खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधिन उपवनसंरक्षक लोकेश पाटील, सहाय्यक वनसंरक्षक अमृत शिंदे, सहाय्यक वनसंरक्षक स्मिता राजहंस, जुन्नरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण, वनपाल कृष्णा दिघे,वनरक्षक किर्ती चिचमलकर, वनरक्षक स्वरूप रेंगडे व वनपरिक्षेत्र जुन्नरच्या संयुक्त पथकाने यशस्वी केली.
” जुन्नर वनविभागामध्ये जुन्नर, आंबेगांव, शिरूर व खेड तालुक्यामध्ये वैविध्यपूर्ण अशी वन व वन्यजीव संपदा आहे. या नैसर्गिक वनसंपदेच्या संरक्षणासाठी वनविभाग अहोरात्र प्रयत्न करत असून, वन वणवा लावल्यामुळे मोठ्या प्रमाणात वनांचे व वन्यजीवांचे नुकसान होते. यास्तव वनविभागमार्फत वनक्षेत्रामध्ये ठिकठिकाणी ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले असून त्यावर ड्रोन सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून देखील नजर ठेवली जात आहे. यास्तव कोणही शासकीय राखीववनात बेकायदेशीरपणे प्रवेश करून नये, वनास आग लावू नये अन्यथा संबंधितांवर भारतीय वन अधिनियम १९२७ व वन्यजीवन (संरक्षण) अधिनियम १९७२ अंतर्गत कडक कारवाई करण्यात येईल. तसेच वनवणवा लावणाऱ्याची नावे वनविभागास कळविल्यास त्यांची नावे गोपनीय ठेवून,त्यांना प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात येईल असे वनविभागाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.




