सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये धडक; आता टीम इंडियासमोर न्यूझीलंडचे आव्हान!
भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे! यजमान आणि गतविजेत्या टीम इंडियाने आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. गुरुवारी झालेल्या अटीतटीच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारताने इंग्लंडचा ७ धावांनी पराभव करून सलग दुसऱ्यांदा जेतेपदाच्या दिशेने पाऊल टाकले आहे. भारताने दिलेल्या २५४ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडला २४६ धावांपर्यंतच मजल मारता आली. आता रविवारी, ८ मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या महामुकाबल्यात भारताची गाठ ‘ब्लॅक कॅप्स’ म्हणजेच न्यूझीलंडशी पडणार आहे. न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला नमवून आधीच अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे.
भारतीय संघासाठी ही ऐतिहासिक कामगिरी आहे, कारण विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक चार वेळा अंतिम फेरीत पोहोचणारा भारत हा पहिला संघ ठरला आहे. यापूर्वी भारताने २००७ मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली आणि २०२४ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली विश्वविजेतेपदावर नाव कोरले होते. २०१४ मध्ये मात्र श्रीलंकेविरुद्ध भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. आता संपूर्ण जगाचे लक्ष सूर्यकुमार यादववर लागले आहे. जर भारताने रविवारी विजय मिळवला, तर सर्वाधिक तीन वेळा टी-२० विश्वचषक जिंकणारा भारत हा जगातील एकमेव संघ ठरेल आणि सूर्या हा चषक उंचावणारा तिसरा भारतीय कर्णधार बनेल.




