सुपर-८ मधील अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात भारतीय संघाने वेस्ट इंडिजवर ५ गडी राखून दणदणीत विजय मिळवला आणि सेमीफायनलचे तिकीट पक्के केले. या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो म्हणजे संजू सॅमसन. त्याने ९७ धावांची नाबाद वादळी खेळी करत संघाला सावरले आणि विजयापर्यंत पोहोचवले. मात्र, हा विजय जेवढा दिमाखदार होता, तितकीच चिंता भारतीय संघाच्या काही चुकांनी वाढवली आहे. सेमीफायनलमध्ये बलाढ्य इंग्लंडचा सामना करण्यापूर्वी या चुकांकडे दुर्लक्ष करणे भारताला महागात पडू शकते.
सध्या भारतीय गोलंदाजीची संपूर्ण मदार जसप्रीत बुमराह याच्या खांद्यावर असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. बुमराह प्रति ओव्हर केवळ ६.३ धावा देत अप्रतिम कामगिरी करत असला तरी, त्याला दुसऱ्या बाजूने म्हणावी तशी साथ मिळत नाहीये. खासकरून फिरकीपटू वरुण चक्रवर्तीच्या खराब फॉर्मामुळे बुमराहवरचा दबाव वाढला आहे. बुमराह सुद्धा एक माणूस आहे, एखादा दिवस त्याचा खेळ खराब झाला तर पर्यायी व्यवस्था काय? हा मोठा प्रश्न संघ व्यवस्थापनासमोर आहे.
गोलंदाजीपेक्षाही भारताची क्षेत्ररक्षण (Fielding) ही सर्वात मोठी डोकेदुखी ठरली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा यांनी दिलेले जीवदान भारताला महाग पडले. अभिषेकने सोडलेल्या कॅचेसमुळे विंडीजने १९५ धावांचा टप्पा ओलांडला. या वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत भारताने सर्वाधिक १३ झेल सोडले आहेत, जे अत्यंत चिंताजनक आहे. तसेच, ‘एक्स फॅक्टर’ असलेल्या सूर्यकुमार यादवला देखील आता मोठी खेळी करून आपला ठसा उमटवावा लागेल. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात जर सूर्या चमकला आणि क्षेत्ररक्षण सुधारले, तरच भारताचा फायनलचा रस्ता सुकर होईल.




