“दु:खी होऊ नकोस भावा, संधी नक्की मिळेल”; माजी कर्णधाराच्या शब्दांनी संजू सॅमसनचे नशीब बदलले
टी-२० विश्वचषक २०२६ च्या उपांत्य फेरीत भारताने धडक मारली असून, या यशाचा खरा नायक ठरला आहे तो म्हणजे संजू सॅमसन. वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद ९७ धावांची ऐतिहासिक खेळी करून संजूने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले. मात्र, या यशाच्या मागे माजी कर्णधार रोहित शर्मा याने दिलेला एक मोलाचा सल्ला होता, ज्याचा व्हिडिओ सध्या आयसीसीने (ICC) सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ ७ फेब्रुवारीचा असून, जेव्हा संजूला सुरुवातीच्या सामन्यांतून बाहेर बसावे लागले होते, त्यावेळचा हा प्रसंग आहे.
विश्वचषकाच्या सुरुवातीला न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत अपयशी ठरल्यामुळे संजू सॅमसनला संघातील स्थान गमवावे लागले होते. त्याच्याऐवजी अभिषेक शर्मा आणि इशान किशन यांना सलामीची संधी देण्यात आली. ७ फेब्रुवारीला अमेरिकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी संजू अत्यंत भावूक आणि नाराज होता. त्यावेळी रोहित शर्माने त्याची भेट घेतली आणि विचारले, “कसा आहेस? दु:खी होऊ नकोस भावा.” संजूने “मी ठीक आहे” असे उत्तर दिले, पण रोहितने त्याला समजावत म्हटले की, “ही स्पर्धा खूप मोठी आहे, तुला कधीही संधी मिळू शकते, फक्त तयार राहा.”
रोहितचे हे शब्द संजूसाठी प्रेरणादायी ठरले. नामिबिया आणि झिम्बाब्वेविरुद्ध मिळालेल्या छोट्या संधींचे त्याने सोने केले आणि १ मार्च रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी करत भारताला उपांत्य फेरीत पोहचवले. ५ मार्च रोजी वानखेडेवर इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या महामुकाबल्यापूर्वी हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने चाहत्यांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे. रोहितच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला हा ‘नवा संजू’ आता उपांत्य फेरीत इंग्लंडच्या गोलंदाजांची कशी पळता भुई थोडी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




