दबंग गर्लच्या डोक्यावर रंगांचा वर्षाव करून पती जहीर इक्बाल पसार; सोशल मीडियावर मजेशीर प्रँकची जोरदार चर्चा
बॉलिवूडची ‘दबंग गर्ल’ सोनाक्षी सिन्हा आणि तिचा पती जहीर इक्बाल ही जोडी लग्नानंतर सातत्याने चर्चेत असते. ७ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर या जोडीने लग्नगाठ बांधली. सुरुवातीला या लग्नाला घरच्यांचा विरोध असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या, मात्र आता हे जोडपे आपल्या सुखी संसारात रमले आहे. सध्या सोशल मीडियावर या दोघांचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून, यात जहीरने सोनाक्षीसोबत केलेल्या एका ‘खतरनाक’ प्रँकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये सोनाक्षी आणि जहीर बाहेर फिरायला जाण्याच्या तयारीत दिसत आहेत. जहीर स्कूटीवर बसलेला असतो आणि सोनाक्षी बाजूला उभी राहून हेल्मेट घालण्याचा प्रयत्न करते. जहीरने तिला हेल्मेट हातात दिले, पण जसेही सोनाक्षीने ते हेल्मेट डोक्यावर चढवले, तसा त्यामध्ये लपवलेला सर्व रंग तिच्या डोक्यावर आणि अंगावर पडला. आपल्या पत्नीची ही अवस्था पाहून जहीरला हसू अनावर झाले. हा प्रँक करून जहीरने तिथे एक क्षणही न थांबता आपली गाडी सुसाट पळवली.
रंगाने माखलेल्या सोनाक्षीने रागाच्या भरात जहीरला मारण्यासाठी त्याच्या मागे धाव घेतली, मात्र जहीर गाडीवर असल्याने तो तिथून निसटण्यात यशस्वी झाला. सोनाक्षीचा हा अवतार आणि जहीरचा खोडकरपणा चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. या मजेशीर व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला असून, “लग्नानंतरही या दोघांमधील मैत्री कायम आहे,” अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या आहेत. लग्नानंतर एका आलिशान घरात शिफ्ट झालेले हे जोडपे सध्या आपल्या आयुष्यातील हे आनंदी क्षण चाहत्यांसोबत शेअर करत आहे.




