spot_img

Sonalee Kulkarni Share Painful Experience : सोनाली कुलकर्णीला हिंदी प्रोजेक्टमधून डच्चू, अभिनेत्रीने उघड केला सिनेसृष्टीचा काळा चेहरा

spot_img

सगळं ठरलं, मानधन निश्चित झालं, पण एका टीझरमुळे सोनालीचा पत्ता कट; मराठी अभिनेत्रीचा ओव्हर द टॉप (OTT) वर संताप

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिला आलेल्या अत्यंत अपमानास्पद आणि विचित्र अनुभवाचा खुलासा केला आहे. ग्लॅमरस दिसणाऱ्या सिनेसृष्टीच्या पडद्यामागे कलाकारांना त्यांच्या दिसण्यावरून आणि वयावरून कसे डावलले जाते, याचे जिवंत उदाहरण सोनालीने मांडले आहे. एका हिंदी ओटीटी (OTT) शोसाठी सोनालीची निवड झाली होती. लेखकांशी चर्चा झाली, मानधन ठरले आणि शुटिंगच्या तारखाही निश्चित झाल्या होत्या. मात्र, ऐनवेळी तिला या प्रोजेक्टमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. याचे कारण सांगताना निर्मात्यांनी दिलेले उत्तर थक्क करणारे होते. “तू आता वयाने मोठी दिसतेस,” असे सांगून तिला या भूमिकेसाठी नाकारण्यात आले.

सोनालीने सांगितले की, ती या भूमिकेसाठी संबंधित टीमला प्रत्यक्ष भेटली होती आणि दोन तास क्रिएटिव्ह चर्चाही झाली होती. मात्र, काही दिवसांनंतर तिच्या ‘तिघी’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आणि त्यानंतर निर्मात्यांचे मत अचानक बदलले. टीझरमधील तिचा लूक पाहून चॅनेलने तिला “वयाने मोठी” ठरवले. वास्तविक, ‘तिघी’मधील तिचा तो लूक त्या विशिष्ट भूमिकेची गरज होती, हे स्पष्ट करूनही निर्मात्यांनी तिचे ऐकले नाही. सोशल मीडिया फॉलोअर्स आणि हिंदीतील लोकप्रियतेचे कारण पुढे करून तिला डावलण्यात आले. सोनालीने लूक टेस्ट देण्याची तयारी दर्शवली होती, तरीही निर्मात्यांनी “आम्ही चॅनेलशी भांडू शकत नाही,” असे म्हणत हात वर केले.

या अनुभवामुळे सोनालीने सिनेसृष्टीतील निकषांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कलाकार एखाद्या भूमिकेसाठी मेहनत घेऊन वेगळा लूक धारण करतो, पण त्याच लूकवरून त्याला इतर कामांसाठी नाकारणे हे दुर्दैवी असल्याचे तिने म्हटले आहे. “मला कोणाशी भांडायचे नाही किंवा काही सिद्ध करायचे नाही, पण नक्की अडचण काय आहे हे समजणे आवश्यक होते,” अशा शब्दांत तिने आपली नाराजी व्यक्त केली. या प्रकरणामुळे सध्या सोशल मीडियावर मराठी कलाकारांना हिंदीत मिळणाऱ्या वागणुकीवर पुन्हा एकदा मोठी चर्चा सुरू झाली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ