‘इंडियन सुपर गेमिंग लीग’मधील व्हिडिओ व्हायरल; ‘रामायण’मधील ‘राम’ अवताराआधी रणबीरच्या कूल लूकची चर्चा
बॉलिवूडचा सुपरस्टार रणबीर कपूर हा त्याच्या अभिनयासोबतच त्याच्या शांत आणि संयमी स्वभावासाठी ओळखला जातो. मात्र, नुकत्याच एका कार्यक्रमात रणबीरच्या खासगी जागेत (Personal Space) घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या पॅपाराझींना त्याने आपल्या खास शैलीत खडे बोल सुनावले आहेत. ‘इंडियन सुपर गेमिंग लीग’च्या एका कार्यक्रमासाठी रणबीर पोहोचला असता, त्याला मीडिया आणि कॅमेरामननी चोहीकडून वेढले. यावेळी एक कॅमेरामन रणबीरच्या अगदी तोंडाजवळ कॅमेरा घेऊन गेल्याने रणबीर काहीसा वैतागला. “कॅमेरा काय थेट तोंडात घालतोयस का, वेडा आहेस का?” अशा शब्दांत त्याने कॅमेरामनची फिरकी घेतली. विशेष म्हणजे, हे बोलताना रणबीरच्या चेहऱ्यावर राग नव्हता, तर त्याने अतिशय मॅच्योरिटी आणि हलक्या-फुलक्या अंदाजात ही परिस्थिती हाताळली, ज्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये रणबीर अत्यंत स्टायलिश आणि क्लासी लूकमध्ये दिसत आहे. त्याने पांढऱ्या टी-शर्टवर जॅकेट, काळी पँट आणि पांढरे स्नीकर्स असा सिम्पल पण प्रभावी पेहराव केला होता. नेटकऱ्यांनी रणबीरच्या या वागण्याचे कौतुक केले असून, “सेलिब्रिटींनाही स्वतःची स्पेस हवी असते, कॅमेरामनने मर्यादा पाळायला हव्यात,” अशा कमेंट्सचा पाऊस पडत आहे. रणबीरने ज्या पद्धतीने परिस्थिती शांतपणे हाताळली, त्यावरून त्याच्या समजूतदारपणाची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.
रणबीर कपूरच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तो सध्या भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात भव्य प्रोजेक्ट ‘रामायण – भाग १’ मध्ये व्यस्त आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटात रणबीर प्रभू श्रीरामाची भूमिका साकारत असून, २०२६ च्या दिवाळीत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत साई पल्लवी (सीता), दाक्षिणात्य सुपरस्टार यश (रावण) आणि सनी देओल (हनुमान) अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. ‘रामायण’च्या चित्रीकरणादरम्यानचा रणबीरचा हा ‘कूल’ अंदाज सध्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.




