“मला हात पसरण्याची गरज नाही”; १००० कोटींचे प्रोजेक्ट्स आणि ७ वर्षांच्या कराराचा अभिनेत्याचा मोठा दावा
बॉलिवूडचा प्रसिद्ध विनोदी अभिनेता राजपाल यादव सध्या ९ कोटी रुपयांच्या ‘चेक बाऊन्स’ प्रकरणामुळे कायदेशीर कचाट्यात सापडला आहे. या गंभीर वादानंतर प्रथमच राजपाल यादवने मुंबईत पत्रकार परिषद घेत आपली सविस्तर भूमिका मांडली. ९ कोटींच्या देण्यावरून न्यायालयात खटला सुरू असतानाही, राजपाल यादव कमालीच्या आत्मविश्वासात दिसला. या कठीण काळात मनोरंजन सृष्टीतील काही कलाकार मदतीला धावून आल्याच्या चर्चा होत्या, विशेषतः अभिनेता सोनू सूद राजपालची मदत करणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, यावर भाष्य करताना राजपालने अत्यंत स्वाभिमानी भूमिका घेतली. “स्वतःची ओळख मी माझ्या कामाने निर्माण केली आहे, त्यामुळे कामासाठी किंवा पैशांसाठी मला कोणासमोरही हात पसरण्याची गरज नाही,” असे त्याने ठामपणे सांगितले.
राजपाल यादवने या पत्रकार परिषदेत आपल्या आगामी व्यावसायिक योजनांचा पाढाच वाचला. त्याने दावा केला की, पुढील ७ वर्षांसाठी त्याने मोठे चित्रपट आणि ब्रँडिंग प्रोजेक्ट्स साइन केले आहेत. यामध्ये अक्षय कुमारसोबतचा ‘भूत बंगला’, ‘वेलकम टू द जंगल’ आणि ‘हैवान’ यांसारख्या मोठ्या चित्रपटांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, चार मोठ्या ब्रँडिंग व्हेंचर्सची एकूण किंमत १००० कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे सांगत, त्याने आपल्या आर्थिक सक्षमतेचे दर्शन घडवले. केवळ अभिनय फी नाही, तर अनेक प्रकल्पांमध्ये ‘इक्विटी शेअर’ (भागीदारी) हा देखील आपल्या कमाईचा भाग असल्याचे त्याने स्पष्ट केले.
कायदेशीर आघाडीवर राजपाल यादवला काहीसा दिलासा मिळाला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने त्याच्या शिक्षेला १८ मार्च २०२६ पर्यंत अंतरिम स्थगिती दिली असून, एक लाख रुपयांच्या वैयक्तिक मुचलक्यावर त्याला जामीन मंजूर केला आहे. कायदेशीर प्रक्रिया सुरू असली तरी, राजपालने सकारात्मकतेने कामावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. अभिनयाप्रती असलेले त्याचे पॅशन आणि आगामी ७ वर्षांचे नियोजन पाहता, तो या आर्थिक संकटातून लवकरच बाहेर पडेल, अशी आशा त्याचे चाहते व्यक्त करत आहेत. सोशल मीडियावर सध्या त्याच्या या ‘स्वाभिमानी’ विधानाची जोरदार चर्चा रंगली आहे.




