spot_img

Sunil Gavaskar and Ravi Shastri Angry Over Laser Show : भारताच्या विजयादरम्यान स्टेडियममध्ये झालेल्या ‘लेजर शो’वर गावसकर-शास्त्री भडकले!

spot_img

“ही वर्ल्ड कप स्पर्धा आहे, आयपीएल नाही”; ड्रिंक्स ब्रेकदरम्यान झालेल्या प्रकाशाच्या खेळावर दिग्गजांची टीका

भारतीय संघाने वेस्ट इंडिजवर मात करत आयसीसी टी-२० वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत धडक मारली असून, संजू सॅमसनच्या नाबाद ९७ धावांच्या खेळीने चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, या ऐतिहासिक सामन्यादरम्यान मैदानावर झालेल्या एका कृतीमुळे भारताचे दोन दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर आणि रवी शास्त्री यांनी थेट समालोचन कक्षातून (Commentary Box) आपला तीव्र संताप व्यक्त केला आहे. सामन्याच्या दुसऱ्या डावात, जेव्हा भारतीय संघ १९६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत होता, तेव्हा ‘ड्रिंक्स ब्रेक’ दरम्यान स्टेडियममध्ये अचानक लेजर शो सुरू करण्यात आला. या शोसाठी मैदानातील मुख्य दिवे बंद करून काही सेकंद काळोख करण्यात आला, ज्यावर या दिग्गज जोडीने कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत.

सुनील गावसकर यांनी या प्रकाराचा उल्लेख ‘तमाशा’ असा करत म्हटले की, “जागतिक स्तरावरील मोठ्या स्पर्धेत अशा मनोरंजनाची अजिबात गरज नाही. अडीच-तीन मिनिटांच्या विश्रांतीनंतर फलंदाजाला पुन्हा मैदानात एकाग्रता साध्य करायची असते, मात्र अशा लेजर शोमुळे खेळाडूंची दृष्टी आणि लक्ष विचलित होते. आयपीएलमध्ये हे सर्व ठीक आहे, पण वर्ल्ड कपच्या बाद फेरीतील सामन्यात असे प्रयोग करणे खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम करू शकतात.” गावसकर यांच्या या मताला रवी शास्त्री यांनीही पूर्ण पाठिंबा दिला. शास्त्री यांच्या मते, खेळाडूंच्या डोळ्यांवर होणारा या प्रकाशाचा परिणाम गंभीर असून, काळोखानंतर पुन्हा प्रखर दिव्यात खेळणे आव्हानात्मक असते.

एकीकडे भारत आता ५ मार्चला वानखेडेवर इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य लढतीसाठी सज्ज होत असताना, दुसरीकडे क्रिकेटमधील अति-व्यावसायीकरण आणि खेळाडूंची सुरक्षा यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. संजू सॅमसनच्या झंझावाती फलंदाजीने भारताला विजय मिळवून दिला असला, तरी मैदानातील अशा तांत्रिक प्रयोगांमुळे खेळाचा दर्जा घसरू नये, अशी स्पष्ट भूमिका या मुंबईकर दिग्गजांनी मांडली आहे. आयसीसी यावर आगामी सामन्यांमध्ये काही बदल करते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ