दक्षिणेतील सुपरस्टार आणि राजकारणात सक्रिय असलेले विजय (थलापती) सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. पत्नी संगीता सोर्नालिंगम यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.
माहितीनुसार, विजय आणि संगीता गेल्या दोन वर्षांपासून वेगळे राहत आहेत. संगीता यांनी 24 फेब्रुवारी रोजी चेंगलपट्टू येथील कुटुंब न्यायालयात अर्ज दाखल करत अभिनेत्यावर विवाहबाह्य संबंध असल्याचा गंभीर आरोप केला आहे. न्यायालयाने हा अर्ज स्वीकारून पुढील प्रक्रियेसाठी कुटुंब कल्याण समितीकडे पाठवला आहे. तसेच त्यांनी पोटगीचीही मागणी केली आहे.
या प्रकरणावर अद्याप विजय किंवा संगीता यांच्याकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, या चर्चेला आणखी हवा मिळाली ती त्यांच्या मुलगा जेसन संजय यांच्या सोशल मीडिया कृतीमुळे. जेसनने आपल्या वडिलांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले असून, त्यामुळे तो आईच्या बाजूने उभा असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दोघांच्या फॉलो लिस्टमध्ये एकमेकांचे अकाऊंट दिसत नसल्याने या घटनेला अधिक महत्त्व मिळाले आहे.
सामान्यत: प्रसिद्धीपासून दूर राहणारा जेसन संजय या कृतीनंतर चर्चेत आला आहे. यावरून विजय आणि संगीता यांच्या नात्यातील तणाव उघड झाला असल्याचे बोलले जात आहे. या घडामोडींमुळे अभिनेत्याचे काही चाहतेही नाराज झाले असून, सोशल मीडियावर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
ऑगस्ट 1999 मध्ये विजय आणि संगीता यांचे लग्न झाले होते. त्यांना दोन मुले आहेत—जेसन संजय आणि दिव्या साशा. आता या घटस्फोटाच्या प्रक्रियेमुळे विजय यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




