“कोणतीही शक्ती अगस्त्यचे नशीब बदलू शकत नाही”; बिग बींचे उदाहरण देत जया बच्चन यांचा कडाका
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा सध्या चित्रपटसृष्टीत आपले पाय रोवण्यासाठी धडपडत आहे. मात्र, ‘द आर्चीज’ आणि २०२६ मध्ये प्रदर्शित झालेला ‘इक्कीस’ या दोन्ही चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळाले नाही. या अपयशाचे खापर नेटकरी सध्या जया बच्चन यांच्या रागीट स्वभावावर आणि पपाराझींसोबतच्या त्यांच्या वादावर फोडत आहेत. जया बच्चन यांच्या वागणुकीमुळे मीडियाने अगस्त्यकडे पाठ फिरवली असल्याची चर्चा सुरू असतानाच, आता खुद्द जया बच्चन यांनी यावर सडेतोड उत्तर दिले आहे.
एका मुलाखतीत बोलताना जया बच्चन म्हणाल्या, “या पृथ्वीवरील कोणतीही शक्ती माझ्या नातवाचे भाग्य बदलू शकत नाही. अगस्त्य स्टार बनणारच आणि त्याला कोणीही रोखू शकत नाही.” आपल्या विधानाच्या समर्थनार्थ त्यांनी अमिताभ बच्चन यांचे उदाहरण दिले. “अमितजी जेव्हा स्टारडमच्या शिखरावर होते, तेव्हा त्यांच्यावर प्रेसने १५ वर्षे बंदी घातली होती. पण त्याचा त्यांच्या करिअरवर काही परिणाम झाला का?” असा सवाल त्यांनी विचारला. पपाराझींचे आणि अगस्त्यचे नाते स्वतंत्र असून माझ्या वागण्याचा त्याच्या करिअरवर कोणताही परिणाम होणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.




