Yellow Alert : विदर्भ, मराठवाडा अन् पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ‘येलो अलर्ट

spot_img

उन्हाच्या चटक्यांमध्येच निसर्गाचा लहरीपणा पाहायला मिळत असून, पुढील तीन दिवस ढगाळ हवामानासह गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचा मोठा फटका शेती पिकांना बसत असल्याने बळीराजा चिंतेत पडला आहे.

महाराष्ट्रात सध्या हवामानाचा विचित्र खेळ पाहायला मिळत आहे. एकीकडे कडाक्याचे ऊन पडत असतानाच, दुसरीकडे भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यात पावसाचा इशारा दिला आहे. विदर्भासह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. विशेषतः १८ ते २० मार्च दरम्यान हा पावसाचा जोर कायम राहणार असून प्रशासनाने अनेक ठिकाणी ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे.

विदर्भात पावसाचा धुमाकूळ:

पूर्व विदर्भातील नागपूर आणि गडचिरोलीमध्ये पहाटेपासूनच विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. गडचिरोलीत तर पहाटे साडेचारच्या सुमारास आलेल्या वादळामुळे अनेक भागांतील वीज पुरवठा खंडित झाला होता. अमरावतीसह पश्चिम विदर्भातही ढगाळ वातावरण असून हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. यामुळे काढणीला आलेल्या गहू आणि हरभरा पिकाचे मोठे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.

मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात गारपीट:

सांगली जिल्ह्यातील मिरज भागात काल झालेल्या गारपिटीने शेतीचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. बागायती पिकांसह शाळूचे पीक भुईसपाट झाले आहे. तसेच लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांतही वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने आंबा, ज्वारी आणि गव्हाच्या पिकांचे नुकसान केले आहे. हिंगोलीतही मध्यरात्री पावसाने हजेरी लावली असून, बळीराजा आता शासनाकडून मदतीची अपेक्षा करत आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ