जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री तसेच नॅशनल कॉन्फरन्सचे संरक्षक डॉ. फारुख अब्दुल्ला यांच्यावर जम्मूमध्ये प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुदैवाने, त्यांच्या सोबत असलेल्या लोकांच्या सतर्कतेमुळे हा हल्ला अपयशी ठरला आणि फारुख अब्दुल्ला सुरक्षित बचावले.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (११ मार्च) फारुख अब्दुल्ला जम्मूतील ग्रेटर कैलाश परिसरात एका वकिलाच्या लग्न समारंभाला उपस्थित होते. सुमारे तासभर कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर ते बाहेर पडत असताना कमल सिंग जामवाल नावाच्या व्यक्तीने मागून त्यांच्या मानेवर बंदूक ठेवत हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी उपस्थित असलेल्या लोकांनी तत्काळ हस्तक्षेप करून हल्लेखोराला पकडले.
या प्रकरणात पोलिसांनी आरोपी कमल सिंग जामवाल याला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. तो जम्मूच्या पुरानी मंडी भागातील रहिवासी असून त्याचा जन्म १९६३ साली झाल्याची माहिती आहे. जुन्या शहर भागात त्याच्या मालकीची काही दुकाने असून त्यावरून मिळणाऱ्या भाड्यावर तो उदरनिर्वाह करत असल्याचे सांगितले जाते.
प्राथमिक चौकशीत आरोपीने धक्कादायक खुलासा करत, तो गेली २० वर्षे फारुख अब्दुल्ला यांना मारण्याचा विचार करत होता, असे सांगितले. हा त्याचा वैयक्तिक अजेंडा असल्याचेही त्याने कबूल केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेच्या वेळी जम्मू-कश्मीरचे उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी देखील फारुख अब्दुल्ला यांच्यासोबत उपस्थित होते. हल्ल्याच्या गोंधळात त्यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. या घटनेनंतर जम्मू परिसरात मोठी खळबळ उडाली असून सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.




