spot_img

Ajit Pawar Plane Crash : विमान अपघातात शहीद अंगरक्षक विदीप जाधव यांच्या कुटुंबाला दिलासा; १ कोटींचा अपघात विमा मंजूर

spot_img

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत शेवटचा प्रवास ठरलेल्या विदीप जाधव यांचा विमा दावा आठवड्यातच निकाली

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाला आता एक आठवडा पूर्ण झाला आहे. २८ जानेवारी रोजी बारामतीजवळ त्यांच्या खासगी विमानाचा भीषण अपघात झाला होता. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह एकूण पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामध्ये त्यांचे अंगरक्षक (PSO) विदीप जाधव, विमानाचे दोन पायलट आणि एका फ्लाइट अटेंडंटचा समावेश होता.

या दुर्घटनेनंतर विदीप जाधव यांच्या कुटुंबासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. जाधव यांनी घेतलेला १ कोटी रुपयांचा अपघात विमा ‘न्यू इंडिया इन्शुरन्स’ कंपनीकडून मंजूर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या निधनानंतर अवघ्या पहिल्याच आठवड्यात हा दावा निकाली काढण्यात आला आहे.

विदीप जाधव हे २००९ साली मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून रुजू झाले होते. त्यांच्या सेवाकाळात त्यांनी २०१४ ते २०१९ दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा पथकात काम केलं होतं. गेल्या काही काळापासून ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अंगरक्षक म्हणून कार्यरत होते.

मुंबईतील कळवा परिसरात वास्तव्यास असलेले विदीप जाधव गेल्या २५ वर्षांपासून विटावा सूर्यनगर येथील श्रीकृष्ण विहारमधील खोली क्रमांक ९ मध्ये कुटुंबासह राहत होते. त्यांच्या कुटुंबात आई-वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.

२८ जानेवारी रोजी पहाटे सुमारे सहा वाजता ते नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडले. “सांभाळून जा, लवकर ये,” असे शब्द त्यांच्या आईने शेवटचे लेकाला सांगितले होते. मात्र तीच भेट अखेरची ठरली. काही तासांतच विमान अपघाताची बातमी घरी पोहोचली आणि संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

माहितीनुसार, विदीप जाधव यांना वडिलांच्या उपचारासाठी आपल्या मूळ गावी जाण्याची घाई होती. फलटण तालुक्यातील तरडवाडी हे त्यांचे गाव असून ते बारामतीपासून अवघ्या २५ किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळेच त्यांनी २८ जानेवारी रोजी अजित पवार यांच्या दौऱ्याची ड्युटी स्वीकारली होती. कामानंतर गावी जाण्याचा त्यांचा विचार होता आणि याबाबत त्यांनी अजित पवार यांनाही कल्पना दिली होती.

गावी “आज येतो” असा निरोप देणाऱ्या विदीप जाधव यांचा तो प्रवास मात्र अखेरचा ठरला. कर्तव्य बजावताना त्यांनी आपलं आयुष्य गमावलं आणि एक कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी देशासाठी शहीद झाला.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ