केंद्रीय हवाई उड्डयाण मंत्रालयाची तीन सदस्यीय समिती सक्रिय, AAIB आणि DGCA पथक घटनास्थळी तैनात
बारामती विमानतळाजवळ झालेल्या भीषण हवाई दुर्घटनेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या घटनेने संपूर्ण राज्याला मोठा धक्का बसला आहे. या अपघाताच्या सखोल तपासासाठी केंद्र सरकारने तातडीने पावले उचलत तीन सदस्यीय विशेष समिती स्थापन केली आहे. एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) आणि डीजीसीएचे तज्ञ पथक कालच घटनास्थळी दाखल झाले असल्याची माहिती मंत्रालयाने दिली आहे.
अजित पवार लिअरजेट 45 या खासगी विमानातून प्रवास करत होते. अपघातस्थळी AAIB चे महासंचालक स्वतः पाहणीसाठी उपस्थित राहिले. दुर्घटनाग्रस्त विमानाचा कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डर आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डर म्हणजेच ब्लॅक बॉक्स सापडल्याने तपासाला गती मिळाली आहे. या उपकरणांमधील माहितीच्या विश्लेषणातून अपघाताच्या शेवटच्या क्षणी कॉकपीटमध्ये नेमकं काय घडलं, याचा उलगडा होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
केंद्रीय हवाई उड्डयाण मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे की, हा तपास पूर्णपणे पारदर्शक, सखोल आणि ठराविक कालमर्यादेत पूर्ण करण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. AAIB नियम 2025 अंतर्गत ठरवलेल्या SOP प्रमाणे चौकशी प्रक्रिया राबवली जात आहे. सध्या दृश्यमानतेची परिस्थिती, वैमानिकाने घेतलेले निर्णय, बारामती विमानतळावरील ऑपरेशनल मर्यादा आणि अनियंत्रित धावपट्टी हे तपासाचे मुख्य मुद्दे आहेत. विशेष म्हणजे, लँडिंगच्या दुसऱ्या प्रयत्नादरम्यान विमान कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
AAIB च्या तज्ज्ञ पथकाने घटनास्थळी फॉरेन्सिक तपास सुरू करत ढिगारा सुरक्षित ताब्यात घेतला असून महत्त्वाचे पुरावे गोळा केले जात आहेत. विमानाची एअरफ्रेम स्थिती, इंजिन लॉगबुक, देखभाल व तपासणी रेकॉर्ड, तसेच क्रू मेंबर्सची पात्रता आणि प्रमाणपत्रांची माहिती विमान कंपनीकडून मागवण्यात आली आहे. या सर्व बाबींच्या सखोल अभ्यासानंतरच अपघाताचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे.




