बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील टाकळी येथे घडलेल्या विलास घुले हत्याकांडात आता महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. सुरुवातीला दोन गटांतील वादातून ही घटना घडल्याचे समोर आले होते. मात्र, एका महिलेने केलेल्या गंभीर आरोपांनंतर या संपूर्ण प्रकरणाचा तपास नव्या दिशेने सुरू झाला आहे. ज्या उमेश मानेला वाचवण्याच्या प्रयत्नात विलास घुले यांचा मृत्यू झाला, त्याच उमेश मानेविरुद्ध आता केज पोलीस ठाण्यात अत्याचार, ब्लॅकमेलिंग आणि धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या हत्याकांडामागील पार्श्वभूमी अधिक गुंतागुंतीची असल्याचे चित्र समोर येत आहे.
पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, उमेश माने याने तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्यानंतर त्या घटनेचे आक्षेपार्ह व्हिडिओ तयार केले. त्यानंतर हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तो तिला वारंवार ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या सततच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून अखेर महिलेने संपूर्ण प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर कुटुंबाने पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला होता.
मात्र, तक्रार दाखल करण्यासाठी जात असताना रमेश घुले यांनी त्यांना अडवून पोलिसांत न जाण्याचा दबाव टाकल्याचा आरोपही महिलेने केला आहे. “यापुढे उमेश त्रास देणार नाही, पण पोलिसांकडे गेलात तर परिणाम गंभीर होतील,” अशी धमकी देण्यात आल्यामुळे भीतीपोटी कुटुंबाने तक्रार दाखल केली नाही, असे तिने सांगितले. या घटनेनंतर सुरक्षिततेच्या कारणास्तव कुटुंबाला शेतातील घर सोडून गावात स्थलांतर करावे लागल्याचाही दावा करण्यात आला आहे. या नव्या गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर पोलिसांनी तपास अधिक तीव्र केला असून, विलास घुले हत्याकांड आणि संबंधित आरोपांमधील संबंधांची सखोल चौकशी सुरू आहे.




