राज्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असतानाच डोंबिवली शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डोंबिवली पूर्व येथील रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या प्रसिद्ध कैलास लस्सी सेंटरला अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले असून, घटनास्थळी धुराचे काळेकुट्ट लोट आकाशात पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्टेशनलगतचा परिसर असल्याने आग लागल्याची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दुकानातून अचानक धूर निघू लागल्यानंतर काही वेळातच आगीच्या मोठ्या ज्वाळा उसळल्या. आग इतकी भीषण होती की, परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आणि जीव वाचवण्यासाठी अनेकांची धावपळ सुरू झाली. या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, आग लागली तेव्हा दुकानातील काही कर्मचारी आत अडकले होते. त्यामुळे काही काळ सर्वांच्या चिंतेत भर पडली होती.
मात्र, प्रसंगावधान राखत अडकलेल्या कर्मचाऱ्यांनी दुकानाच्या मागील बाजूच्या खिडकीतून बाहेर पडत स्वतःची सुटका करून घेतली. हा संपूर्ण प्रकार अत्यंत थरारक आणि जीवघेणा असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्यांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळल्याचे सांगितले जात आहे.
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, याबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नसली, तरी या घटनेमुळे डोंबिवली परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.




