हायकोर्टाजवळील कॅफेमध्ये दुपारच्या सुमारास थरार; अद्याप कोणत्याही संघटनेकडून जबाबदारी नाही
सिरियाची राजधानी दमिश्क येथून एक अत्यंत धक्कादायक आणि भीषण बातमी समोर आली आहे. येथील हायकोर्टाजवळ असलेल्या एका गजबजलेल्या कॅफेमध्ये गुरुवारी अचानक झालेल्या एका मोठ्या स्फोटाने संपूर्ण परिसर हादरून गेला. या हृदयद्रावक दुर्घटनेत ९ जणांचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य २० जण गंभीर जखमी झाले आहेत. हा कॅफे न्यायालय परिसराजवळ असल्याने येथे नेहमी वकील आणि स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी असते, अशी माहिती मिळत आहे. स्फोट इतका भयानक होता की, परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आणि नागरिकांची जीव वाचवण्यासाठी धावाधाव सुरू झाली.
या भीषण घटनेनंतर सोशल मीडियावर काही थरारक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहेत. या व्हिडिओंमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेले जखमी नागरिक आणि त्यांना वाचवण्यासाठी स्थानिक पोलिसांची होणारी धडपड स्पष्ट दिसत आहे. घटनेची माहिती मिळताच सुरक्षा दल आणि रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. पोलिसांनी तात्काळ संपूर्ण परिसराला वेढा घातला असून, जखमींना उपचारासाठी दमिश्कच्या जवळच्या रुग्णालयांमध्ये हलवले आहे. काही किरकोळ जखमींवर घटनास्थळीच प्राथमिक उपचार करण्यात आले.
दरम्यान, या अमानुष हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही. मात्र, सुरक्षा यंत्रणांनी या प्रकरणाचा तपास युद्धपातळीवर सुरू केला आहे. ‘अल जजीरा’च्या वृत्तानुसार, दमिश्कचे गव्हर्नर माहेर मारवान यांनी या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. गृह मंत्रालयाने या प्रकरणाचा प्राथमिक तपास पूर्ण केला असून, यामागील मुख्य सूत्रधार कोण आहे, हे लवकरच समोर येईल असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, ज्यांनी सिरियाच्या निष्पाप नागरिकांचे रक्त सांडले आहे, त्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही आणि त्यांना याची मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशाराही गव्हर्नर यांनी दिला आहे.




