प्रशासकीय निष्काळजीपणाचा फटका; लोणी काळभोरमध्ये ठेकेदारावर गुन्हा, पालघरमध्ये पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला
महाराष्ट्रभरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले असून, विविध दुर्घटनांमध्ये चार जणांना आपला जीव गमावावा लागला आहे. पुण्यात एका बांधकाम कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे दोन वर्षांच्या चिमुरड्याचा अंत झाला, तर ठाणे आणि कल्याण भागात रस्त्यांवर साचलेल्या पाण्यात वीजप्रवाह उतरल्याने दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनांमुळे स्थानिक प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
पुण्यातील लोणी काळभोर परिसरात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. सांडपाणी आणि पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी रस्त्यावर खोल खड्डे खोदण्यात आले होते. मात्र, कंत्राटदाराने या खड्ड्यांभोवती कोणतीही सुरक्षा यंत्रणा किंवा बॅरिकेड्स लावले नव्हते. पावसामुळे हे खड्डे पाण्याने तुडुंब भरले होते. घराबाहेर खेळत असताना सोहम लखन कसबे या अवघ्या दोन वर्षांच्या बालकाचा पाय घसरला आणि तो या खड्ड्यात पडला, ज्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी सुरक्षा उपाययोजना न करता काम अर्धवट सोडल्या ठपका ठेवत अज्ञात ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पावसाळ्यात उघड्या राहिलेल्या विजेच्या तारा नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहेत. कल्याण-डोंबिवली भागात रस्त्यावर साचलेल्या पाण्यात तुटलेली विजेची तार पडली होती. २६ वर्षीय शशी राहुल चक्र हा तरुण या पाण्यातून जात असताना त्याला विजेचा जोरदार झटका बसला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे, तार तुटल्याची कल्पना स्थानिकांनी आधीच वीज विभागाला दिली होती, तरीही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. अशीच आणखी एक घटना ठाण्यातील मुंब्रा येथे घडली, जिथे रस्ता ओलांडताना पाण्यात उतरलेल्या १७ वर्षीय आलिया या तरुणीला उघड्या वायरमधील वीजप्रवाहाचा करंट लागला आणि तिने जागीच प्राण गमावले.
दुसरीकडे, पालघर जिल्ह्यातील चहाडे गावातून एक दुर्दैवी बातमी समोर आली आहे. मुसळधार पावसामुळे स्थानिक नदीला मोठा पूर आला होता. या पूरपरिस्थितीत २८ वर्षीय किशन वरठा हा तरुण मासेमारीसाठी नदीत उतरला. मात्र, पाण्याच्या प्रचंड प्रवाहाचा अंदाज न आल्याने तो नदीत वाहून गेला. आपत्ती व्यवस्थापन आणि स्थानिक प्रशासनाने शोधमोहीम राबवल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह हाती लागला. पावसाळ्यात नद्या, नाले दुथडी भरून वाहत असल्याने नागरिकांनी पाण्याच्या प्रवाहात उतरण्याचे धाडस करू नये. तसेच रस्त्यांवर पाणी साचलेले असल्यास वीजवाहक खांब आणि उघड्या तारांपासून दूर राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.




