Mumbai : विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक 1 जुलैला; डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या नावाची जोरदार चर्चा

spot_img

महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठीची निवडणूक 1 जुलै रोजी होणार असल्याची घोषणा विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी केली आहे. सध्या हे पद रिक्त असून, त्यासाठीची निवड प्रक्रिया अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे. या निवडणुकीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, शिवसेना शिंदे गटाच्या ज्येष्ठ नेत्या आणि विधान परिषदेच्या माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा होत आहे.

विधान परिषद नियमावलीनुसार उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी बुधवार, 1 जुलै 2026 हा दिवस निश्चित करण्यात आला आहे. इच्छुक उमेदवारांच्या प्रस्तावांची लेखी सूचना मंगळवार, 30 जून रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत विधानमंडळ सचिवालयात सादर करणे आवश्यक राहणार आहे. प्राप्त झालेल्या नामनिर्देशन अर्जांची छाननी त्याच दिवशी दुपारी 1 वाजता करण्यात येणार असून, त्यानंतर उपसभापतीपदासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, अशी माहिती सभापती राम शिंदे यांनी दिली.

दरम्यान, विधान परिषदेच्या माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा सदस्यत्वाचा कार्यकाळ 13 मे 2025 रोजी संपुष्टात आला होता. त्यामुळे हे पद काही काळापासून रिक्त होते. नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत डॉ. नीलम गोऱ्हे या बिनविरोध निवडून आल्याने त्यांचे राजकीय स्थान अधिक मजबूत झाले आहे. त्यामुळे उपसभापतीपदासाठी त्यांच्याच नावाला सर्वाधिक पसंती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यातील सत्तासमीकरणाचा विचार करता, विधान परिषद सभापती आणि विधानसभा अध्यक्ष ही दोन्ही महत्त्वाची पदे भारतीय जनता पक्षाकडे आहेत, तर विधानसभा उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडे आहे. त्यामुळे सत्ताधारी महायुतीतील समतोल राखण्यासाठी विधान परिषदेचे उपसभापतीपद शिवसेना शिंदे गटाकडे जाणे जवळपास निश्चित मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. नीलम गोऱ्हे यांची पुन्हा एकदा उपसभापतीपदी वर्णी लागण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे.

आता उपसभापतीपदासाठी कोणाचा अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल होतो आणि निवडणुकीत नेमकी काय घडामोड होते, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ