आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) एका कार्यक्रमात उपस्थिती लावल्यानंतर सोशल मीडियावर आणि राजकीय स्तरावर सुरू झालेल्या चर्चांना उत्तर दिले आहे. नुकतेच नागपूरचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी आज पदभार स्वीकारला. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आपल्या नवीन जबाबदारीसह आरएसएसच्या कार्यक्रमातील सहभागाबाबतही भूमिका स्पष्ट केली. संबंधित कार्यक्रमाला उपस्थित राहून आपण कोणत्याही सेवा नियमांचे उल्लंघन केलेले नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
नागपूरसारख्या महत्त्वाच्या शहराच्या पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारताना मुख्यमंत्री आणि शासनाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. कायदा आणि सुव्यवस्था राखणे, प्रभावी पोलीसिंग करणे, महिला व बालकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणे आणि नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वास निर्माण करणे हे आपल्या कामाचे प्रमुख उद्दिष्ट असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. “आमच्या खांद्यावरील IPS या पदनामातील ‘S’ म्हणजे सेवा असून, पोलीस दल हे नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि सेवेसाठी आहे. सामान्य नागरिकांनी पोलिसांना घाबरण्याचे कारण नसून, केवळ गुन्हेगारांनाच कायद्याची भीती वाटली पाहिजे,” असेही त्यांनी नमूद केले.
आरएसएसच्या कार्यक्रमात उपस्थित राहण्याबाबत सुरू असलेल्या टीकेवर भाष्य करताना विश्वास नांगरे पाटील म्हणाले की, एक पोलीस अधिकारी म्हणून त्यांची संपूर्ण निष्ठा भारतीय संविधान आणि त्याच्या मूल्यांशी आहे. नागपूर ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची भूमी असून, त्यांच्या विचारांचा आपल्या जीवनावर प्रभाव असल्याचे त्यांनी सांगितले. विविध सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक संस्थांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणे ही आपल्या कामकाजाचा आणि सामाजिक संवादाचा एक भाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले की, ज्या कार्यक्रमावरून आक्षेप घेतले जात आहेत, तो कार्यक्रम 19 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला होता आणि त्यासाठी त्यांना निमंत्रण देण्यात आले होते. त्या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. तेथे वस्तू आणि सेवा कर (GST) विषयक मार्गदर्शन, आध्यात्मिक विषयांवरील चर्चा तसेच सामाजिक प्रश्नांवर संवाद झाला होता. गेल्या तीन दशकांपासून पोलीस सेवेत कार्यरत असताना आपण रमजान ईद, इफ्तार, जैन, शीख आणि इतर धर्मीयांच्या कार्यक्रमांनाही उपस्थित राहत आलो असल्याचे त्यांनी सांगितले.
विश्वास नांगरे पाटील यांनी पुढे स्पष्ट केले की, संबंधित कार्यक्रमात त्यांनी मानवी कल्याणासाठी सामूहिक प्रार्थना, संत ज्ञानेश्वरांच्या विचारांचा संदर्भ, युवकांमध्ये वाढणाऱ्या अमली पदार्थांच्या समस्येवर चिंता आणि पोलीस दलातील करिअरच्या संधी यांसारख्या विषयांवर भाष्य केले होते. त्यामुळे या कार्यक्रमातील उपस्थितीमुळे सेवा नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप तथ्यहीन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, हा कार्यक्रम ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताच्या 150 व्या वर्षपूर्ती आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आला होता, त्यामुळे त्यामध्ये सहभागी होण्यात कोणताही नियमभंग झाल्याचे वाटत नसल्याचेही त्यांनी सांगितले.
विश्वास नांगरे पाटील यांच्या या स्पष्टीकरणानंतर त्यांच्या भूमिकेवर सुरू असलेली चर्चा आणखी रंगण्याची शक्यता असून, त्यांच्या वक्तव्यांवर विविध राजकीय आणि सामाजिक स्तरांतून प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




